• Sat. Mar 21st, 2026

शहरात चंद्र दर्शनानंतर शनिवारी उत्साहात साजरी होणार रमजान ईद

ByMirror

Mar 20, 2026

ईदगाह मैदानावर सकाळी 10 वाजता सामुदायिक नमाज

रमजान महिन्याची सांगता

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात शुक्रवारी चंद्र दर्शन झाल्यानंतर शनिवारी (दि. 21 मार्च) रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. कोठला परिसरातील ईदगाह मैदानावर सकाळी 10 वाजता सामुदायिक नमाज अदा करण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर यतीम खाना हिलाल कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.


रमजान हा इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधवांकडून उपवास (रोजा), प्रार्थना, दानधर्म आणि आत्मशुद्धी यावर विशेष भर दिला जातो. यंदा रमजान महिन्यात 30 रोजे पूर्ण झाले असून, विशेष म्हणजे या पवित्र काळात पाच शुक्रवार आल्याने धार्मिक वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते.


शुक्रवारी ‘अलविदा जुम्मा’ची विशेष नमाज नालेगाव येथील जामा मशिदीसह शहरातील सर्वच मशिदींमध्ये मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडली. या वेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलविदा जुम्मा म्हणजे रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार असून त्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
रमजान महिन्यात केलेल्या रोज्यांची सांगता शुक्रवारी झाली असून, आता ईद-उल-फित्रच्या सणाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शनिवारी सकाळी शहरातील विविध भागातील मशिदींमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ईदच्या नमाजची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक मशिदींमध्ये भाविक नमाज अदा करणार असून, ईदगाह मैदानावर होणाऱ्या मुख्य सामुदायिक नमाजासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ईद हा आनंद, बंधुभाव आणि एकतेचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी मुस्लिम समाजात एकमेकांची गळा भेट घेऊन ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देतात. तसेच गरीब व गरजूंसाठी जकात आणि फित्रा देण्याची परंपराही पाळली जाते. शहरातही ईदच्या निमित्ताने आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र सणाची तयारी पूर्ण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *