दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग; फार्मसिस्टच्या कार्याची व शिक्षणाची जागृती
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला, फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढली. या रॅलीद्वारे फार्मसिस्टच्या कार्याची व शिक्षणाची जागृती करण्यात आली. यामध्ये दोन हजारपेक्षा अधिक फार्मसी कॉलेजच्या युवक-युवतींनी सहभाग नोंदवला.

या रॅलीचे उद्घाटन लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांच्या हस्ते सर्व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापकांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले. अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. योगेश बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली अडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी, शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, काकासाहेब म्हस्के कॉलेज, विश्व भारती कॉलेज, ओम साई प्रतिष्ठान कॉलेज ऑफ फार्मसी, एस.एस.पी.एम. पाऊल बुधे कॉलेज ऑफ फार्मसी, सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी, धर्माय साई सैनिक प्रतिष्ठान ऑफ फार्मसी, पाऊल बुध्दे फार्मसी ऑफ कॉलेज असे 10 कॉलेज सहभागी झाले होते.
शहरातील प्रमुख मार्गावरुन या रॅलीचे मार्गक्रमण झाले. जनजागृतीवर घोषवाक्याचे फलक हातात घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन प्रोफेसर महादेव लाल श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. हे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) ने सुरू केले होते. भारतात फार्मसी शिक्षणाच्या स्थापनेत प्रा. लाल यांची मोठी भूमिका होती. त्यांच्या भूमिकेचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला.

फार्मसिस्ट हा पेंशट व डॉक्टर यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहे. कोरोना काळात अनेक रुग्णांना फार्मसिस्ट बांधवांनी योग्य औषधे उपलब्ध करुन त्यांना आधार दिले. त्यांचे कार्य समाजाच्या निरोगी आरोग्यासाठी सुरु असल्याची भावना माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केली.
डी फार्मा व बी फार्मा डिप्लोमा डिग्री कोर्स विद्यार्थी करतात. डॉक्टर हा चांगला फार्मसिस्ट असतो अस म्हंटल जात. त्यामुळे योग्य शिक्षणाने पाया मजबूत होतो. सध्याच्या आधुनिक काळात औषधे अत्यंत प्रभावी, कमी मात्रेतही गुणकारी, त्वरित परिणाम करणारी पण घातक दुष्परिणामही असलेली आहेत. योग्यपणे वापरली तर अमृत, अन्यथा विषारी देखील ठरु शकतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे औषधांचे प्रकारही नवनवीन विकसित होत गेले. डॉक्टर रोगनिदान व उपचारांत तज्ज्ञ, पण फार्मसिस्ट हा औषधतज्ज्ञ, त्यामुळे फार्मसिस्टची रुग्णाभिमुख भूमिका विकसित व विस्तारीत होत आहे. फार्मसिस्ट हा डॉक्टरांना पूरक व आरोग्य सेवेतील महत्वाचा घटक बनला असल्याचे डॉ. योगेश बाफना यांनी सांगितले.
