युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद
फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारानेच देशामध्ये सामजिक क्रांति -कमलाकांत काळे
नगर (प्रतिनिधी)- महामानवाच्या त्यागामुळे मिळालेले हक्क अधिकार शासक वर्ग योजना बनवून संपवत आहेत. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारानेच देशामध्ये सामजिक क्रांति शक्य आहे. बहुजन समाजामध्ये भय आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी देशात अराजकता निर्माण केली जात आहे. ते दूर करण्याचे काम कार्यकर्त्यांना प्रबोधनाने करावे लागणार असल्याचे प्रतिपादन युनिटी ऑफ मूलनिवासी समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे यांनी केले.
श्रीगोंदा येथे युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेच्या एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना काळे बोलत होते. पुढे त्यांनी त्याग आणि समर्पणाच्या भावनेने परिवर्तनाच्या चळवळीत कार्यकर्त्यांनी कार्य करावे लागणार असल्याचे स्पष्ट करुन संघटनेचे ध्येय, उद्दिष्टे, विचारधारा, रणनीति आणि भविष्यातील वाटचाल याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात यावेळी युनिटी ऑफ मूलनिवासी समाज या संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी राजेंद्र करंदीकर (पारनेर) व राज्य संयोजकपदी प्रा. अजित खरसडे (श्रीगोंदा) यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. प्रशिक्षणासाठी नगर जिल्ह्यासह पुणे, सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी बापू बोराटे, रमेश कूसाळकर, नामदेव राळेभात, सुरेश गायकवाड, विजय गायकवाड, सचिन झगडे, विठ्ठल शिंदे, विठ्ठल साळवे, डॉ. दत्तात्रय जगताप, डॉ. प्रशांत साळवे, डॉ. दत्तात्रेय भरणे, अश्विन कांबळे, राजेंद्र बचाटे आदी उपस्थित होते. सचिन झगडे यांनी आभार मानले.