5 सप्टेंबर रोजी निमगाव वाघात रंगणार संमेलन; राज्यातील साहित्यिकांची राहणार उपस्थिती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी राजेंद्र सुंदरदास फंड यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने हे संमेलन होत आहे.
5 सप्टेंबरला होणाऱ्या साहित्य संमेलनानिमित्त गावातून ग्रंथ दिंडी काढली जाणार आहे. या दिंडीत साहित्यिक व कवी सहभागी होणार आहेत. यानंतर परिवार मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यांचे परिसंवाद आणि व्याख्याने आयोजन करण्यात आले आहे. मध्य सत्रात कवी संमेलन रंगणार असून, त्याद्वारे ग्रामीण भागातील काव्यप्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
राजेंद्र सुंदरदास फंड हे साहित्य, सांस्कृतिक मंडळ, महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. साहित्य चळवळीत ते सक्रीय असून, एक उत्तम लेखक आहेत. त्यांनी देडगांवचा बालाजी, चिकूनगुणिया, फायदे एन.आर.एच.एम. चे व ध्यास हागणदारी मुक्तीचा ही पुस्तके लिहिली आहेत. त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने त्यांची अध्यक्षपदी एकमताने निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
