नान्नज दुमाला, तळेगाव दिघे येथे काळी आई ओल संधारण मोहिमेतंर्गत उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- कायमचा दुष्काळ संपविण्यासाठी पीपल्स हेल्पनाईच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या काळी आई ओल संधारण मोहिमेतंर्गत नान्नज दुमाला, तळेगाव दिघे (ता. संगमनेर) 32 एकर शेत जमीनीसाठी रेन गेन बॅटरीचा प्रयोग कार्यान्वीत करण्यात आला. ग्रीन मार्शल भाऊसाहेब थोरात जन्मशताब्दीचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
विनायक गुंजाळ यांच्या 32 एकर शेत जमिनीमध्ये रेन गेन बॅटरीच्या कामाचे उद्घाटन ॲड. कारभारी गवळी यांच्या हस्ते झाले. 1972 नंतर गेली 52 वर्षे दुष्काळाने होरपळलेल्या नान्नज दुमाला, तळेगाव दिघे परिसरात हा प्रयोग राबविण्यात आला आहे. जमिनीमध्ये शंभर फुट लांब, पाच फूट रुंद आणि सात फूट खोलीचा समतोल खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यांमध्ये दगड, गोटे टाकून वरच्या बाजूला मुरूम टाकला जाणार आहे आणि उताराच्या बाजूला येणारे पावसाचे सर्व पाणी यामध्ये सोडले जाणार आहे. त्यामुळे शेतामध्ये किमान 25 ते 30 ठिकाणी रेन गेन बॅटरी बसवून संपूर्ण 32 एकर क्षेत्र हंगामी बागायती नक्कीच होणार असल्याचा विश्वास ॲड. गवळी यांनी व्यक्त केला आहे.
जेसीबी मशीनच्या मदतीने रेन गेन बॅटरीसाठी खड्डे खोदण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी जमीन मालक विनायकराव गुंजाळ, अर्णव गुंजाळ, संजय चत्तर, राजू चित्तर, रामनाथ अभाळे, अण्णा चत्तर, संतोष चत्तर, खंडू चत्तर, नामदेव चत्तर आदी उपस्थित होते.
रामनाथ आभाळे म्हणाले की, आपली पृथ्वी ही नैसर्गिक रेन गेन बॅटरी आहे. जमिनीच्या वरच्या स्तरात पाणी मोठ्या प्रमाणात साठवण्याची क्षमता आहे. पूर्वी दाट जंगलामुळे झाडांच्या मुळा शेजारुन जमिनीमध्ये पाणी मुरले जायचे. वृक्षतोडीमुळे तो मार्ग कमी झाला आहे आणि म्हणून जमिनीतील ओलावा संपला आहे. माणसाच्या अतिलोभीपणामुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. त्यामुळे जमिनीच्या नैसर्गिक पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेचा वापर रेन गेन बॅटरीमुळे नक्की वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जमिनीचे मालक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायक गुंजाळ यांनी संपूर्ण बत्तीस एकर शेतीमध्ये ओलावा टिकविण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे. आपल्याला मोठे यश आले, तर संपूर्ण शेतकऱ्यांना आत्महत्येच्या खाईतून आणि दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी त्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नान्नज दुमालाच्या दुष्काळी पट्ट्याला सातत्याने लढूनही पाटपाणी मिळाले नाही. निळवंडे धरणाचे पाट पूर्वेच्या खालच्या बाजूने दहा किलोमीटर लांबून गेलेले आहे. त्यामुळे जमिनीतील ओल वाढवण्यासाठी मानवी प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या एका दिवसाच्या मुक्कामामुळे पवित्र झालेले हे गाव आहे. महावने लावावी, जलाशये निर्मावी ही माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील संदेशाची अंमलबजावणी करण्याचे यावेळी ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले. मोठ्या संख्येने ग्रामस्थ रेन गेन बॅटरीचा नाविन्यपूर्ण उपक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते.