• Wed. Oct 15th, 2025

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी रेन बॅटरी तंत्र

ByMirror

Jun 27, 2024

लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने प्रचार-प्रसाराची मोहिम जारी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या आत्महत्या शून्यावर आणून त्यांना दारिद्य्राच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने रेन बॅटरी तंत्राच्या जागृतीसाठी मोहिम जारी केली आहे. दुष्काळी भागात हिरवळ फुलवून शेती पिकविण्यासाठी रेन बॅटरी या तंत्रामुळे शेताच्या बांधावर व शहरी भागातील रस्त्याच्या कडेच्या झाडांना वर्षभर जमिनीखाली ओलावा राहून झाडे जगणार आहे. तर शहर आणि ग्रामीण भागातील इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरविण्यासाठी उपयुक्त ठरणार व जलसंधारणाचे कामही प्रभावीपणे होणार असल्याचा दावा लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने करण्यात आला आहे.


शेत जमीन लगत तसेच प्रत्येक झाडापासून 5 फुट अंतरावर खड्डे घेऊन खड्ड्यात दगड, गोटे टाकून वरच्या बाजूला मुरुमाने खड्डा बंद केला आणि पावसाचे वाहून येणारे पाणी या खड्ड्याकडे वळवले तर जलसंधारण मोठ्या प्रमाणात होते आणि बाष्पीभवन 90 टक्के पर्यंत नियंत्रित केले जात असल्याचे रेन बॅटरी हे तंत्र आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या शून्यावर आणून त्यांना दारिद्य्राच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी रेन बॅटरी हे तंत्र क्रांतिकारक ठरणार आहे. हे तंत्र वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने 70 टक्के पर्यंत अनुदान दिले पाहिजे, असा लोकभज्ञाक चळवळीचा आग्रह आहे.


आजपर्यंत जलसंधारण आणि वृक्ष लागवड संवर्धन वेगवेगळ्या पद्धतीने केली जात होती. त्यासाठी सरकारचे दोन वेगवेगळे खाते कार्यरत आहेत. परंतु जलसंधारण आणि फळबागायती एकाच खात्यामार्फत राबविणे आवश्‍यक आहे. धनराई योजनेअंतर्गत हंगामी बागायती शेतीमध्ये चिंच, आवळा, बोर, आंबा, खजुर इत्यादी फळ देणाऱ्या झाडांची लागवड करता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक झाडापासून 5 फुट अंतरावर 5 फूट खोलीचा आणि 3 बाय 3 चा खोल खड्डा खोदून रेन बॅटरी तंत्र आमलात येऊ शकते. झाडांच्या मुळाशी वर्षभर ओलावा टिकून राहिल आणि ती झाडे जिवंत राहणार आहे. या प्रयोगाने शेतकऱ्याला दरवर्षी एकरी 50 हजार रुपयांच्यावर उत्पन्न मिळू शकते. त्याचबरोबर प्रत्येक एकर जमिनीच्या उताराच्या बाजूला 20 बाय 10 आणि 15 फूट खोलीच्या खड्ड्यात बॅटरी तंत्र वापरल्यास जलसंधारणाचे काम यशस्वी होऊन जमिनीखाली वर्षभर ओलावा टिकून राहणार आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना हंगामी बागायतदार होण्याची संधी निर्माण होणार असल्याचे चळवळीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


आजपर्यंत जलसंधारणाच्या वेगवेगळ्या तंत्रापेक्षाही हे तंत्र अधिक प्रगत ठरणार आहे. या तंत्रामुळे झाडे मोठ्या प्रमाणात जगवून ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न देखील सोडविता येऊ शकणार आहे. महाराष्ट्रात दोन कोटीच्यावर हंगामी बागायतदार शेतकरी निर्माण होऊन त्यांना चांगला आर्थिक फायदा होणार असल्याचे म्हंटले आहे.


शहरी किंवा ग्रामीण भागातील घरांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी बोअरवेल शेजारी रेन बॅटरी लावून मोठ्या प्रमाणात जलसंधारण करता येते. त्यामुळे पिण्याचे किंवा वापरण्याच्या पाण्याचा प्रश्‍न देखील मागील मार्गी लागू शकतो. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या सुटून 70 टक्के पर्यंत टँकर होणार आहे. एकंदरीत पाणीटंचाई आणि ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न चांगल्या प्रकारे सोडविण्यासाठी रेन बॅटरीशिवाय पर्याय नसल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. रेन बॅटरी तंत्राच्या प्रचार प्रसारासाठी ॲड. गवळी, संजय बारस्कर, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *