अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी येथे 2021 मध्ये गाजलेल्या खून खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानुसार आरोपीची जेलमधून सुटका करण्यात आली.
विष्णू दिघे यांचा मृतदेह 12 जुलै 2021 रोजी राहुरी येथील एका शेताच्या कडेला रस्त्यावर पडलेला अशोक दिघे यांना आढळला. त्यानंतर त्यांनी मयत विष्णू दिघे यांचा भाऊ रावसाहेब दिघे यांना मृत्यूची बातमी कळवली. त्यानंतर रावसाहेब दिघे यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे विष्णू दिघे यांच्या खुनाची फिर्याद नोंदवली. फिर्याद नोंदवल्यानंतर तपासी अधिकारी यांनी सदर खूनाचा तपास सुरू केला. पोलीस तापासाअंती विष्णू दिघे यांचा खून राजू हारून मन्सुरी यांनी व्याजाने घेतलेल्या पैशासाठी केलेला आहे असे निष्पन्न झाले. त्यामुळे राजू हारून मन्सुरी याला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांच्या सखोल तपासानंतर आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

आरोपी विरुद्ध सत्र न्यायाधीश वामन दैठणकर यांच्यासमोर खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करणे कामी सरकारी पक्षाने एकूण 13 साक्षीदारांच्या साक्ष कोर्टासमोर नोंदवल्या. या खून खटल्यात आरोपी तर्फे ॲड. परिमल फळे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. सदर खटल्यात आरोपीकडून ॲड. परिमल फळे यांनी हा खून त्यांच्या आशिलाने केलेला नसल्याचा बचाव कोर्टासमोर मांडला. साक्षीदारांचे उलट तपास घेतले. सुनावणीअंती ॲड. फळे यांनी साक्षीदारांचे घेतलेले उलट तपास, न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश दैठणकर यांनी आरोपी राजू हारून मन्सुरी यांची या खून खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्या कामी ॲड. परिमल फळे यांना ॲड. आशिष पोटे, ॲड. अक्षय कुलट, ॲड. आनंद कुलकर्णी यांनी सहाय्य केले.