भाजपचे जिल्हा सरचिटणीस सविता कोटा यांची मागणी
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती चित्राताई वाघ यांच्यासह मुख्यमंत्री यांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- सर्व शासकीय कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असावी, या मागणीचे निवेदन भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांना भाजपचे जिल्हा सरचिटणीस सविता प्रकाश कोटा यांनी दिले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष जयश्रीताई अहिरराव प्रदेश सचिव गीताताई गिल्डा, महिला अध्यक्षा प्रिया जानवे, लीलावती अगरवाल कालिंदीताई केसकर, रेखा मेड, संध्याताई पावसे, राखी आहेर, नीता फाटक, सुरेखा जंगम, संध्या पावसे, छायाताई राजपूत, मीराताई सरोदे, सुजाता औटी आदी उपस्थित होते. तसेच शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत सदर मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
महाराष्ट्रासह देशभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी शताब्दी साजरी होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य संपूर्ण देशात व देशातील कानाकोपऱ्यात सरकारच्या माध्यमातून पोहचवले जात आहे. हे कार्य निरंतर सुरू राहणार असून, या कार्याचा एक भाग म्हणून सर्व शासकीय कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अहिल्यादेवी होळकर यांनी देशासाठी, सर्व महिलांसाठी, धर्मासाठी व मंदिरांसाठी प्रेरणादायी कार्य केले आहे त्यांचे कार्य हे निरंतर असेच तेवत ठेवण्यासाठी व त्यांची प्रेरणा घेऊन आदर्श असा समाज उभा राहणार आहे. त्यांच्या कार्याची व विचारांची प्रेरणा मिळण्यासाठी त्यांच्या प्रतिमा सर्व कार्यालयात लावण्याचे आदेश निर्गमीत करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.