दोन दिवसीय संगीत महोत्सवात रसिक श्रोते भारावले; शास्त्रीय संगीताच्या मैफलीने वाढवली रंगत
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील न्यू आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील संगीत विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत महोत्सवात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. संगीत महोत्सवाच्या समारोपीय द्वितीय सत्रात महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये पं.डॉ.राम देशपांडे व त्यांचे सुपुत्र व पट्टशिष्य गंधार देशपांडे यांच्या गुरुशिष्य परंपरा अंतर्गत ‘सहगायन’ या शास्त्रीय संगीताच्या मैफलीने रंगत भरली.
मागील सहा वर्षांपासून नगारा संगीत महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात येते आहे. यावर्षी दोन दिवसीय नगारा संगीत महोत्सव उत्साहात पार पडले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव मुकेश मुळे, सदस्या निमाताई काटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे व संचालक डॉ.बी.एच.झावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीत विभागप्रमुख प्रा.आदेश चव्हाण यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे सचिव मा.ॲड. विश्वासराव आठरे पाटील यांनी संस्थेची पार्श्वभूमी विशद केली तसेच नगारा संगीत महोत्सवास अहिल्यानगरकर रसिकांच्या मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
समारोप सत्रात डॉ.राम देशपांडे व त्यांचे सुपुत्र व पट्टशिष्य गंधार देशपांडे यांच्या गुरुशिष्य परंपरा अंतर्गत ‘सहगायन’ या शास्त्रीय संगीताच्या मैफलीस सुरुवात झाली. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग ‘भूप’ ने केली. यानंतर त्यांनी रसिकांच्या खास आग्रहास्तव ‘राग सोहनी’, ‘राग यमन’ व ‘राग मालकंस’ प्रभावीपणे सादर केले. मौलिक आलापी, सुंदर बंदिशी व दोघांचेही उत्कृष्ट सादरीकरण यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचा समारोप करतांना त्यांनी सादर केलेल्या ‘इथे का रे उभा श्रीरामा’ या अभंगाने अवघे वातावरण भक्तिमय केले. त्यांना तबल्यावर प्रशांत गाजरे, संवादिनीवर मकरंद खरवंडीकर, पखवाजवर सौरभ साठे, टाळावर ऋतिक बैरागी व तानपुऱ्यावर दिनकर सूर्यवंशी व ऋतिक देसाई या सर्वांनी उत्कृष्ट साथसंगत केली. या संपूर्ण कार्यक्रमास सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने नगरकर संगीतप्रेमी रसिकांची उपस्थिती लाभली होती.
दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचलन प्रा. ढोकणे यांनी केले. शेवटी आभारप्रदर्शन प्रा. कल्याण मुरकुटे यांनी मानले. या संपूर्ण नगारा संगीत महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य, डॉ.संजय कळमकर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.अनिल आठरे, प्रबंधक बबन साबळे यांचे मार्गदर्शन लाभले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संगीत विभागप्रमुख प्रा. आदेश चव्हाण, प्रा. अभिजीत अपस्तंभ, प्रा. योगेश अनारसे, प्रा. कल्याण मुरकुटे, नगारा संगीत महोत्सव समितीचे सर्व सदस्य, संगीत विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
