वृक्षसंवर्धनासाठी पाण्याची तातडीची गरज; हरदिन मॉर्निंग ग्रुपचे ब्रिगेडियर यांना निवेदन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमधील वृक्षसंवर्धनासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्याचे निवेदन छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडीयर पी. सुनिलकुमार यांना देण्यात आले आहे. पार्कमध्ये पाणीपुरवठा आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी ब्रिगेडीयर पी. सुनिलकुमार यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. यावेळी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी आणि मनोनीत सदस्य वसंत राठोड उपस्थित होते.
गेल्या 25 वर्षांपासून हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण व संवर्धनाचे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. मात्र, पार्कमधील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. सध्या शिवाजी पार्कमधील विहिरीवरून पाणीपुरवठा होत असला, तरी ते पाणी कमी प्रमाणात आणि लांब अंतरावरून येत असल्याने संपूर्ण पार्कला पुरेसे पाणी मिळत नाही.
यापूर्वी सहा वर्षांपूर्वी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यावर ग्रुपच्या सदस्यांनी स्वतः पुढाकार घेत टँकरद्वारे महिनाभर पाणीपुरवठा करून झाडे वाचवली होती. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही झाडांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
छावणी कार्यालयाजवळील सर्व्हे नंबर 184 मधील लष्करी डेअरी फार्म परिसरात मोठी विहीर असून त्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. सध्या त्या विहिरीतील पाण्याचा वापर होत नसल्याने ते पाणी जॉगिंग पार्कसाठी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यामुळे पार्कमधील पाणीटंचाई दूर होऊन वृक्षसंवर्धनाला मोठा हातभार लागेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने ब्रिगेडीयर पी. सुनिलकुमार यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना सन्मानचिन्ह आणि रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित स्मरणिका देऊन गौरविण्यात आले. ब्रिगेडीयर सुनिलकुमार यांनी निवेदनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांना याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच पार्कमधील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
