जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात वृक्षारोपणातून पर्यावरण जागृतीचा संदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जय हिंद फाउंडेशनच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुख्यमंत्र्यांचं झाड महाराष्ट्राचं फूल उपक्रमाअंतर्गत ताम्हण झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी परिसरात हरितश्री निर्माण करत सामाजिक बांधिलकी जपणारा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉर्डन लीडर विद्यासागर कोरडे यांच्या हस्ते वृक्षाची लागवड करण्यात आली. यावेळी जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, चंद्रकांत पवार, लक्ष्मण शेरकर, संजय म्हस्के, सुनील देशमुख, ढाकणे मेजर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्कॉर्डन लीडर विद्यासागर कोरडे म्हणाले की, ताम्हण हे झाड महाराष्ट्राचे अधिकृत फूल असून, राज्य शासनाने या फुलाची निवड करून त्याला गौरव दिला आहे. हे झाड फुलताना त्याचे निळसर जांभळ्या छटेचे सुंदर फुल महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचं प्रतीक मानले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धोरणात्मक नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त ताम्हण वृक्षारोपणासारखा पर्यावरण पूरक उपक्रम राबवणे ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक, विशेषतः विद्यार्थ्यांनी ताम्हण झाडाची माहिती घ्यावी, हे या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी पालवे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे राजकारण व समाजकारणातील दमदार व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या नावाने महाराष्ट्राचे फुल असलेले ताम्हणच्या रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये या वृक्षाची लागवड होणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र शासन व वन विभागाच्या माध्यमातून झाडे उपलब्ध करून देण्यात यावी. जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्राच्या फुलची ओळख निर्माण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आभार शिवाजी गर्जे यांनी मानले.