एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक व त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- देहरे गावातील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या युवकास पोलीसांनी केलेल्या मारहाणीचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नगर तालुक्याच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. रिपाईचे नगर तालुका उपाध्यक्ष जयराम आंग्रे यांना मारहाण करणारे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सोबत असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, जयराम आंग्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
जयराम आंग्रे 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मतदान करण्यासाठी देहरे गावातील मतदान केंद्रावर गेले होते. त्या ठिकाणी मतदान करून बाहेर येत असताना एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी मतदान कार्यालयात काही लोकांना अश्लील शिवीगाळ केली. तेथून आंग्रे बाहेर पडत असताना पोलीस निरीक्षक यांनी विचारणा करुन धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. यासंबंधी विचारणा केल्यास त्यांच्या समवेत असलेल्या तीन सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आंग्रे यांनी केला आहे.
शांततामय वातावरणात मतदान सुरु असताना पोलिसांनीच शिवीगाळ व मारहाण करुन वातावरण खराब केले. उपस्थित असणाऱ्या लोकांनी आंग्रे यांना पोलिसांपासून वाचवले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या युवकास मारहाण करणारे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.