• Thu. Jan 22nd, 2026

दुष्काळी पट्टयात काळी आई अक्षय ओल अमृतकुंभ आणि काळी आई धनराई योजनेचा प्रस्ताव

ByMirror

Dec 25, 2024

पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार

दुष्काळी परिस्थिती कायमची संपविण्याचा उपक्रम

नगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांची दुष्काळी परिस्थिती कायमची संपविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने क्रांतिकारक रेनगेन बॅटरी तंत्राचा आग्रह शेतकऱ्यांकडे धरला आहे. नान्नज दुमाला येथील ज्येष्ठ शेतकरी बाबुराव गवळी यांना अभिवादन करुन संगमनेरच्या दुष्काळी पट्टयात काळी आई अक्षय ओल अमृतकुंभ आणि काळी आई धनराई अशा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
1972 च्या अगोदर चार बैलांच्या मदतीने 30 एकर जमीन कसून आर्थिक स्थिती मजबूत ठेवलेले शेतकरी बाबुराव दामू गवळी यांनी 1972 च्या दुष्काळापासून 52 वर्षे दुष्काळवास सहन केला. या दुष्काळामुळे संपूर्ण कुटुंब आणि शेती सर्वच बाबतीत अडचणी येऊन त्यांचे निधन झाले. निसर्ग आणि सरकारच्या लहरीपणामुळे लक्ष्यावधी शेतकऱ्यांचा दुष्काळी वनवास संपलेला नाही. म्हणून रेनगेन बॅटरी तंत्राचा प्रचार-प्रसार संघटनेने सुरु केला आहे.


90 टक्के पावसाचे पाणी वाहून जाण्यामुळे किंवा ऊन, वाऱ्यामुळे झालेले बाष्पीभवन शेतीसाठी उपयुक्त ठरत नाही. त्यात पावसाने उशीर केला तर जमिनीतील ओल संपून जाते आणि शेतकरी दुष्काळाच्या खाईत पडतो. त्यामुळे तमाम शेतकऱ्यांनी निसर्गाशी भागीदारी करुन पावसाचे पाणी जमिनीखाली मुरूमात साठवून ठेवण्याची यंत्रणा असलेल्या रेनगेन बॅटरी तंत्राचा स्विकार करण्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.


पूर्वी मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांच्या मुळाद्वारे पाणी जमिनीत मुरत होते. परंतु मोठी वृक्षतोड झाल्यामुळे निसर्गाच्या पाणी साठविण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यातून वाळवंटासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. या तंत्राच्या माध्यमातून जमिनीत उताराच्या बाजूला वीस फूट लांब, तीन फूट रुंद आणि आठ फूट खोल खड्डे करून त्यामध्ये दगड गोटे वरपर्यंत भरायचे आणि वरच्या बाजूला सहा इंचचा जाड मुरूम पसरावयचा आहे. पावसाचे पाणी अशा खड्ड्यात सोडले तर पुढच्या 24 तासात जमिनीखाली मोठा ओलावा तयार होतो. पावसाचे पाणी वाहून जाणे किंवा त्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण 90 टक्के पर्यंत थांबते. चार-दोन पावसात त्या जमिनीला वर्षभर किमान ओळावा टिकू शकतो, त्यातून फळबागा नक्की जगू शकणार आहे आणि दुष्काळ कायमचा संपवता येणार आहे. यापुढे शेतकऱ्यांना सरकार किंवा निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता हंगामी शेती बागायतीचा भाग म्हणून करता येणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी काळी आई अक्षय ओल अमृतकुंभ आणि काळी आई धनराई योजना राबविण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.


ज्ञानेश्‍वर माऊलींनी जलाशये निर्मावी, महावने लावावी असा आदेश मानव जातीला ज्ञानेश्‍वरीतील एका ओळीने दिला आहे. हा आदेश निसर्गाचा परमेश्‍वरी आदेश असून, याची जाण शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे. महाराष्ट्रात दुष्काळवास संपवता येणार आहे. नान्नज दुमाला येथील विनायक गुंजाळ या शेतकऱ्याच्या 35 एकर जमिनीवर काळी आई अक्षय ओल अमृतकुंभ आणि काळी आई धनराई योजना राबविण्यात येणार आहे. ज्ञानेश्‍वरीचे पूजन करून रेन गेन बॅटरी बसविण्यात येणार असून, यावेळी संपूर्ण पंचक्रोशीतील शेतकरी या उपक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *