खेळामुळे व्यक्तिमत्त्व विकास -धनेश बोगावत
नगर (प्रतिनिधी)- खेळण्यामुळे चपळता वाढते, त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकासही घडतो. खेळताना जिंकण्याचे ध्येय जरूर असावे, तथापि फक्त जिंकण्यासाठी खेळू नका. त्यातून मिळणाऱ्या आनंदासाठी खेळत राहा. नेहमी खिलाडू वृत्तीने खेळ खेळावे, असे आवाहन माजी टेबल टेनिस खेळाडू व स्वीट होमचे संचालक धनेश बोगावत यांनी केले.
गुलमोहोर रोड, ओंकार कॉलनीमधील स्मॅश टेबल टेनिस ॲकॅडमी स्पर्धेतील पारितोषिक वितरण धनेश बोगावत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथितयश फिजिशियन डॉ. हरजितसिंह कथुरिया, ॲकॅडमीचे संचालक राजेश जहागीरदार, ओंकार भंडारी, निमिश सोरटूरकर, स्वप्निल करवंदे, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते.
पुढे बोगावत म्हणाले की, खेळांमधे टेबल टेनिसला विशेष महत्त्व आहे. त्याचा सातत्याने सराव केल्यास नजर एकाग्र होते आणि बुध्दीही विकसित होत राहते. या खेळाने शारीरिक व मानसिक विकास साधला जातो. माझ्या काळात जे चॅम्पियन टेबल टेनिसपटू होते, त्यामधील बरेचसे यशस्वी आय.आय.टी.यन. झाले आहेत. या खेळाने बुद्ध्यांक वाढतो. टेबल टेनिससाठी चांगल्या व अद्ययावत साधनसामग्रीने स्मॅश ॲकॅडमी सुसज्ज आहे. त्यामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रात मोलाची भर पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विविध गटांमध्ये जनरल चॅम्पियनशिप पटकावणारे खेळाडू बिगिनर ग्रूप- निर्वी देवळालीकर, ज्युनिअर ग्रूप- साहिल करवंदे व सान्वी जाधव आणि व्हेटरन ग्रूप- राजेश जहागीरदार आणि इतर खेळाडूंना बोगावत यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.