निरोगी आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानाकडे वळावे -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे पार पडलेल्या नगर तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण नवनाथ विद्यालयात करण्यात आले. खो-खो, कबड्डी, गोळा फेक, धावणे स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य नवनाथ होले, नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, नगर तालुका तालिम सेवा संघाचे सचिव पै. बाळू भापकर, विकास निकम, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, मंदा साळवे, अमोल वाबळे, प्रमोद थिटे, तृप्ती वाघमारे, तेजस केदारी, भानुदास लंगोटे, निकिता रासकर आदींसह शिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, निरोगी आरोग्यासाठी मैदानाकडे वळण्याची गरज आहे. शरीर संपदा हीच खरी संपत्ती असून, दररोज मैदानी खेळ खेळले पाहिजे. शालेय पातळीवर विविध स्पर्धेत सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. प्राचार्य नवनाथ होले यांनी आजचा युवक हा मोबाईलच्या विळख्यात गुरफटलेला आहे. त्यांना पुन्हा मैदानात आणण्याची गरज आहे. युवा पिढी मैदानी खेळापासून दुरावल्याने विविध आजारांमध्ये वाढ झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन निरोगी आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळण्याचे त्यांनी आवाहन केले.
नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली खो-खो, कबड्डी, गोळा फेक व 100 मीटर धावणे स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतील विजेत्या संघ व खेळाडूंना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. विजेत्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पै. महेश शेळके याची निवड झाल्याबद्दल सत्कार
निमगाव वाघाचे कुस्तीपटू पै. महेश शेळके याची अहिल्यानगर शहरात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजनगटातील गादी विभागात निवड झाल्याबद्दल त्याचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.