शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासह व्यसनमुक्तीवर सुरु असलेल्या कार्याचा सन्मान
नगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान देऊन भावी पिढी व्यसनमुक्त करण्यासाठी सातत्याने राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयाचे मुख्याध्यापक हबीब चाँदभाई शेख यांना आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय शिक्षणसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जळगाव (अडावद, ता. चोपडा) येथील जिल्हाधिकारी कार्यालय, अल्पबचत भवन मध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पाचोराचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते शेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी फारुक शेख, हकीम चौधरी, समिना शेख, फारुक पटेल, संस्थेचे अध्यक्ष फारुख शाह नौमानी, उपाध्यक्ष डॉ. जावेद शेख, सचिव जुबेर शाह, कल्पना दबडे आदी उपस्थित होते.
हबीब शेख अनेक वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्यातून भावी पिढी घडविण्याचे कार्य ते करत आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ते सातत्याने करत आहे. विद्यालयाचा तालुक्यात स्तर उंचावण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. तसेच भावी पिढी व्यसनमुक्त होण्यासाठी सातत्याने ते व्याख्यानाद्वारे प्रबोधन करत आहे. त्यांनी आपले भाग्योदय विद्यालय देखील तंबाखूमुक्त केले असून, विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामाची जागृती ते करत आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय शिक्षणसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शेख यांना या पूर्वी देखील कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षण मंत्री यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते व नुकतेच त्यांना जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिक्षण संचालकांच्या हस्ते गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आला आहे. शेख यांना सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भानुदास कोतकर, संस्थेचे सचिव सचिन कोतकर, भाग्योदय विद्यालय केडगावचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड, विद्यालयातील शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.