• Wed. Jul 2nd, 2025

प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लागड्डा यांचा निसर्ग श्रीमंत न्यायाधीश सन्मानाने गौरव

ByMirror

Aug 18, 2024

वृक्षारोपण व व्यापक पर्यावरण संरक्षणामुळे निसर्गाचा समतोल अबाधित राहणार -न्यायाधीश यार्लागड्डा

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचा परिसर हिरवाईने फुलविण्यास महत्त्वाची भूमिका घेणारे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांचा स्वातंत्र्य दिनी अहमदनगर जिल्हा वकील संघाच्या वतीने निसर्ग श्रीमंत न्यायाधीश सन्मानाने गौरव करण्यात आला. वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नरेश गुगळे यांनी न्यायाधीश यार्लागड्डा यांना सन्मानित केले. यावेळी सौ. मालती यार्लागड्डा, जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


सन्मानाला उत्तर देताना जिल्हा न्यायाधीश यार्लागड्डा म्हणाले की, वृक्षारोपण व व्यापक पर्यावरण संरक्षणामुळे निसर्गाचा समतोल अबाधित राहणार आहे. जिल्हा न्यायालयाच्या आवारात निसर्गरम्य हिरवाई फुलविण्यासाठी मोठ्या संख्येने वकील आणि न्यायिक कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग आहे. भारतीय संविधानातील कलम 51 (अ) मधील मूलभूत कर्तव्य आपण केले आणि यापुढे सुद्धा ते करत राहणार असल्याचे स्पष्ट केले.


अहमदनगर बारा असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नरेश गुगळे पदाधिकारी, सदस्य व ॲड. कारभारी गवळी यांनी जस्टीस वुईथ ग्लोबल विस्डम या संकल्पनेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सहकार्याने व्यापक स्वरूप देण्याचा प्रस्ताव ठेवला. या कार्यक्रमात सत्र न्यायाधीश यार्लागड्डा यांच्या संकल्पनेतून स्वच्छता सेवक व्ही.व्ही. छजलानी, एम.सी. जाधव, एस.व्ही. वायफळकर, ए.बी. लोट व ए.एस. टोणे यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नरेश गुगळे म्हणाले की, प्रधान न्यायाधीश यार्लागड्डा यांच्या सकारात्मक आणि दूरदर्शी भूमिकेमुळे न्यायालय परिसर हा निसर्गरम्य झाला आहे. याचा न्याय संस्थेला व वकिलांना अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सौ. मालती यार्लागड्डा यांचा जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अहमदनगर न्यायालय परिसरामध्ये फुलविण्यात आलेल्या हिरवाईने अनेक वकील संघांनी बोध घेऊन पर्यावरणाचे काम सुरू केले आहे. अहमदनगर वकील संघाचे सदस्यही वृक्षरोपण व संवर्धनासाठी सहकार्य करीत आहे. मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण करून पर्यावरणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी सहकार्य करण्याची वकीलांची भूमिका असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. नितीन खैरे यांनी केले. न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने न्यायाधीश, वकील वर्ग व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *