ज्येष्ठ महिलांनी केला पारंपरिक संस्कृतीचा जागर
महिला सशक्तीकरणाला चालना देणारा उपक्रम -मीना सारडा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रयास दादी-नानी ग्रुपच्या ज्येष्ठ महिलांचा पारंपरिक हळदी-कुंकू सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ महिलांनी एकत्र येत मराठी संस्कृतीचा जागर केला. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी उखाणे, गवळणी, भजने तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
सारसनगर येथील श्री वर्धमान जैन श्रावक संघाच्या सभामंडपात मीना विष्णू सारडा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नवनिर्वाचित नगरसेविका सुनीता भगवान फुलसौंदर व आशा किशोर डागवाले उपस्थित होत्या. याप्रसंगी दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, सल्लागार विद्या बडवे, प्रिया जानवे, छाया राजपूत, वंदना गारुडकर, मेघना मुनोत, ज्योती गांधी, उज्वला बोगावात, रोहिणी पवार, श्यामा काबरा, विद्या कचरे, लीला अग्रवाल, सुशीला त्र्यंबके, वनिता शिंदे, उषा सोनी, आरती थोरात, सुजाता कदम, अलका वाघ, सुनिता काळे, प्रतिभा पेंडसे, आरती वाडेकर, शशिकला झरेकर, शकुंतला जाधव, जयश्री पुरोहित, रेखा मैड, रेखा फिरोदिया, उषा सोनटक्के, बेबी बारस्कर, दीपा मालू, उज्वला मालू, सरला जाकोटिया, दीपा सोनी आदींसह ग्रुपच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अध्यक्षीय भाषणात मीना विष्णू सारडा म्हणाल्या की, हळदी-कुंकू हा केवळ धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम नसून तो आपल्या परंपरा, संस्कृती व नातेसंबंध जपणारा सोहळा आहे. अशा कार्यक्रमातून महिलांना एकत्र येऊन आपले विचार मांडण्याची, अनुभवांची देवाण-घेवाण करण्याची संधी मिळते. यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून महिला सशक्तीकरणाला दिशा मिळते. महिलांनी एकमेकांना आधार देत समाजात सकारात्मक बदल घडवावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात अध्यक्षा जयाताई गायकवाड यांनी दादी-नानी ग्रुपच्या माध्यमातून ज्येष्ठ महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक तसेच सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. महिलांचे आरोग्य, मानसिक प्रसन्नता व सामाजिक सहभाग वाढविणे हा या ग्रुपचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
नवनिर्वाचित नगरसेविका सुनीता फुलसौंदर व आशा डागवाले यांनी प्रयास ग्रुपच्या कार्याचे कौतुक करत महिलांच्या विविध प्रश्नांसाठी नेहमी तत्पर राहून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमात विविध मनोरंजनात्मक, कौशल्यात्मक व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा महिलांनी मनसोक्त आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच विविध स्पर्धांचे नियोजन कु. वैष्णवी लड्डा यांनी केले. स्पर्धांतील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार ज्योती कानडे यांनी मानले.
