निमगाव वाघा येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त रंगणार संमेलन
संयोजन समितीची नियोजन बैठक संपन्न
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सहावे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी महिला साहित्यिक प्रतिभा खैरनार यांची निवड करण्यात आली.
स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव वाघा (ता. नगर) येथे रविवार, दि. 17 मे रोजी होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच संयोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत खैरनार यांची निवड करण्यात आली. या बैठकीसाठी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष व संमेलनाचे मुख्य संयोजक पै. नाना डोंगरे, गणराज प्रकाशनचे प्रा. गणेश भगत, कवयित्री सरोज आल्हाट, बाळासाहेब देशमुख, भाऊसाहेब कदम, कवी गीताराम नरवडे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, निवृत्ती महाराज कानवडे, राजेंद्र घोडके, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, बाळासाहेब मुनतोडे आदी उपस्थित होते.
प्रतिभा खैरनार या ता. नांदगाव (जि. नाशिक) येथील साहित्यिका असून, त्यांचे विविध काव्यसंग्रह व कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या काव्यसंग्रह व कथासंग्रहाला विविध पुरस्कार देखील मिळालेले आहेत. साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी संयोजन समितीच्या वतीने एकमताने निवड करण्यात आली.
या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात राज्यभरातील नवोदित तसेच ज्येष्ठ साहित्यिक सहभागी होणार असून साहित्य क्षेत्रातील विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. यावेळी काव्य संमेलनाचेही आयोजन करण्यात आले असून अनेक कवी व कवयित्री आपल्या रचना सादर करणार आहेत. तसेच छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडे व कविता सादर करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले जाणार आहे. तसेच या संमेलनात समाजातील विविध क्षेत्रांत निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी विशेष पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहेत. या संमेलनासाठी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे व बेलापूर महाविद्यालयाच्या प्राचार्या गुंफाताई कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
