शिक्षण क्षेत्रातील लढाऊ कार्याची दखल; शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटित लढ्याचा निर्धार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षक नेते प्रसाद शिंदे यांची शिक्षक सेनेच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या शिंदे यांच्या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्तीचे पत्र शिक्षक आमदार किशोर दराडे व शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेना प्रमुख तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, राज्याध्यक्ष व शिक्षक आमदार किशोर दराडे, राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण तसेच राज्य कार्यकारणी यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, शिक्षकांच्या न्याय्य मागण्या व त्यांच्या हक्कांसाठी सुरु असलेल्या शिंदे यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीप्रसंगी हरिष मुंडे, शिक्षक नेते वैभव सांगळे, अविनाश साठे, अशोक आव्हाड, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे आदी शिक्षक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक आमदार किशोर दराडे म्हणाले की, प्रसाद शिंदे हे शिक्षण क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करणारे नेतृत्व आहे.
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी वेळोवेळी विविध आंदोलने उभारली असून, शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी ते सदैव पुढाकार घेतात. शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार म्हणून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी प्रसाद शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संघटनात्मक बांधणी मजबूत करत जिल्ह्यात शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रभावी कार्य घडवून आणतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना प्रसाद शिंदे म्हणाले की, “शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मी नेहमीच अग्रेसर राहीन. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य सुरु राहणार आहे. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी सर्व वरिष्ठांचे आभार मानले.
