शिवजयंतीचा उपक्रम
महिलांच्या वतीने महाराजांना अभिवादन
नगर (प्रतिनिधी)- लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व महापुरुषांचे विचार रुजविण्यासाठी प्रगती फाऊंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेशभूषा स्पर्धा पार पडली. सावेडी येथील बटरफ्लाय नर्सरीमध्ये झालेल्या या स्पर्धेत बाळगोपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदींच्या वेशभूषा परिधान करुन उपस्थितांचे लक्ष वेधले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महिलांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रगती फाऊंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी वाघ, शिक्षिका जानवी परदेशी, निकिता कदम आदींसह महिला पालक वर्ग उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांसह विविध पात्रांची वेशभूषा साकारुन त्यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. या स्पर्धेत शांभवी हजारे, आश्लेषा सोनवणे, सानवी गायकवाड, अर्णवी शिंदे, स्वामिनी कोरेकर, समर्थ कदम, अवधूत भुतकर, आर्वी शेलार, प्रणील लोहकरे, साई साठे, अनय कोतकर, प्रथमेश दळवी, वेदांती दिंडे, प्रियांश चावरे, रेवा गिरवले आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
अश्विनी वाघ म्हणाल्या की, मुलांमध्ये महापुरुषांचे विचार रुजविण्यासाठी व आपल्या देशाचा ज्वाजल्य इतिहास माहिती होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमध्ये महापुरुषांचे विचार रुजल्यास खऱ्या अर्थाने देश महासत्ता होणार आहे. इतिहास माहीत झाल्याशिवाय भविष्य घडविता येत नाही, त्यासाठी आपल्या पूर्वजांचा इतिहास विद्यार्थ्यांपुढे ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.