• Thu. Oct 16th, 2025

परीक्षा कालावधीत जारी केलेली माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणूक पुढे ढकला

ByMirror

Feb 14, 2025

विरोधी संचालकांची मागणी; अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा

परीक्षेत गुंतलेले शिक्षक उमेदवार प्रचार कसा करणार? -महेंद्र हिंगे

नगर (प्रतिनिधी)- परीक्षा कालावधीत जारी करण्यात आलेली माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी विरोधी संचालकांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शुक्रवारी (दि.14 फेब्रुवारी) जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी मुटकुळे यांना देण्यात आले. यावेळी विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे व क्रीडा महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार शितोळे आदी उपस्थित होते. सदर निवडणूक पुढे न ढकळल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जारी करण्यात आला आहे. संस्थेचे 9,152 सभासद असून हे सर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहे. सध्या दहावी व बारावी बोर्डाच्या वार्षिक परीक्षा चालू झाल्या असून, त्याचे कामकाज 20 मार्चपर्यंत चालणार आहे. सदर परीक्षेच्या नियोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पूर्णपणे गुंतलेले आहेत. मार्च 2025 च्या शेवटच्या आठवड्यापासून पाचवी ते नववीच्या परीक्षेचे शासनाने आयोजन केलेले आहे. परीक्षा काळात शिक्षकांच्या सभा आयोजन, भेटीगाठी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. जिल्ह्यात 14 तालुक्यात सुमारे 700 शाळा असून त्यामध्ये 9152 सभासद विखुरलेले आहेत. निवडणूक काळात परीक्षा असल्याने उमेदवारांना फॉर्म भरणे, प्रचार करण्यासाठी रजा मिळू शकत नाही. या अडचणी पाहता निवडणूक लोकशाही पद्धतीने होणे अशक्य असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
31 जानेवारी रोजी संस्थेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना परिक्षा व पर्यवेक्षण इत्यादी शालेय कामकाजासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा उपनिबंधकांनी परिक्षाच्या काळात निवडणुकीचा प्रोग्रॅम लागणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेतली जाईल असे आश्‍वासन दिले होते. मात्र तरी देखील परीक्षा काळात निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने शिक्षक वर्गामध्ये नाराजी पसरली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 23 मार्च रोजी होणारी निवडणूक रद्द करून ती 31 मे च्या दरम्यान घ्यावी, किंवा जून, जुलै 2025 मध्ये घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
–—–
परीक्षा काळात राबविण्यात येत असलेल्या निवडणुक प्रकियेमुळे शिक्षक उमेदवारांना मतदारापर्यंत पोहचणे अशक्य होणार आहे. तर परीक्षा काळात कर्तव्य बजवावे की, प्रचार करावे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. या परिस्थितीची जाणीव ठेऊन जिल्हा उपनिबंधकांनी सदर निवडणुक प्रक्रिया दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे परीक्षा काळात घेऊ नये. -महेंद्र हिंगे (विरोधी संचालक)

मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी…………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *