वकील संघाच्या जस्टीस वुईथ ग्लोबल विस्डम या प्रस्तावास प्रधान जिल्हा न्यायाधीशांचा सकारात्मक प्रतिसाद
लोक अदालत मध्ये तडजोडीने प्रकरण मिटवणाऱ्या पक्षकारांनी झाडे लावण्याची संकल्पना
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर वकील संघाच्या जस्टीस वुईथ ग्लोबल विस्डम या प्रस्तावास अहमदनगर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लागड्डा यांना जिल्हा वकील संघाच्या वतीने निसर्ग श्रीमंत न्यायाधीश म्हणून सन्मान केला जाणार असल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नरेश गुगळे व ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी अमदनगर वकील संघाच्या सदस्यांच्या सहकार्याने नवीन न्यायालयाच्या इमारती समोर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले. त्यामुळे हा संपूर्ण परिसर हिरावाईने फुलला असून, पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत हातभार लागला आहे. वकील व न्यायाधीशांनी एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेला हा उपक्रम दिशादर्शक बनला आहे.
वकील संघाच्या मदतीने न्याय संस्थेने आजपर्यंत अनेक लोक अदालत यशस्वी केले, परंतु यापुढे तडजोडीने प्रकरण मिटवणाऱ्या पक्षकारांना वकील संघाच्या वतीने विनंती करून किमान दोन झाडे लावण्याचा आग्रह धरला जाणार आहे. लोकन्यायालयात लाखो रुपयांची वसुली करणाऱ्या कंपन्या, बँका, विशेषत: विमा कंपन्या यांनी प्रत्येक मिटणाऱ्या प्रकरणामागे किमान दहा झाडे लावून त्याच्या संवर्धनाबाबत स्पष्ट शपथपत्र वकील संघ मागणार आहे. अर्थात ही बाब ऐच्छिक राहील. प्रत्येक लोक न्यायालयामध्ये मिटणाऱ्या प्रकरणामुळे प्रत्येक वेळी किमान एक हजार ते पाचशे झाडे लावून ते जगविण्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे लोकांना न्याय मिळत असताना ग्लोबल वॉर्मिंग विरुद्ध लढण्याचे प्रोत्साहन मिळून पर्यावरण संवर्धनाची जागृती होणार आहे. यामुळे वृक्ष लागवड संवर्धनाबाबत व्यापक प्रचार प्रसार होऊ शकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायधीश भाग्यश्री पाटील यांनी या संदर्भात पुढाकार घेतलेला आहे. प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लागड्डा यांनी सुद्धा वकील संघाच्या या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पर्यावरण संवर्धन चळवळीला गती देण्यासाठी वकील संघाने जस्टिस वुईथ ग्लोबल विस्डम ही मोहिम स्वीकारली आहे.