• Sat. Apr 12th, 2025

राजकीय दबावामुळे दूध संघाच्या अवसायन प्रक्रियेला विलंब

ByMirror

Apr 11, 2025

17 महिन्यांपासून अंतिम आदेश प्रलंबित; 1 मेपासून कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण

अहमदनगर तालुका सहकारी दूध व्यवसायिक संघाच्या अवसायनात राजकीय हस्तक्षेप -तायगा शिंदे

नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर तालुका सहकारी दूध व्यवसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित या संस्थेच्या अवसायन प्रक्रियेला 17 महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही अंतिम आदेश न झाल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले असून, त्यांनी 1 मे पासून विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक येथील कार्यालया समोर साखळी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. संघाचे कर्मचारी प्रतिनिधी तायगा बापू शिंदे व श्री. गजानन खरपुडे यांनी हा इशारा दिला असून, 30 एप्रिलपर्यंत कारवाई न झाल्यास कठोर आंदोलन करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.


8 नोव्हेंबर 2023 रोजी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक विभाग यांनी संघाला अवसायनात घेतल्याचे अंतरिम आदेश काढले होते. मात्र, कायद्यानुसार एक महिन्याच्या आत अंतिम आदेश अपेक्षित असतानाही आजतागायत तो आदेश न झाल्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये असंतोष पसरला आहे. सदर निर्णयात माजी संचालक मंडळाने संघाचे आर्थिक नुकसान केल्याचे पुरावे असूनही त्यांच्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. उलट, त्यांच्या पाठीशी राजकीय पाठबळ असल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.


कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्याचे प्रभारी कार्यकारी संचालक माजी संचालक मंडळाच्या संपर्कात राहून कारवाईस विलंब लावत आहेत. देणी आणि प्रॉव्हिडंट फंड मिळण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे कार्यालयाकडून देण्यात येत नाहीत. एवढेच नव्हे, तर कार्यालयाकडून योग्य माहिती देण्यासही टाळाटाळ होत आहे.


प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळत नसून, ही बाब अन्यायकारक आहे. न्यायालय किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाकडून स्थगिती आदेश नसताना, अवसायनाचे अंतिम आदेश प्रलंबित ठेवणे हा राजकीय हस्तक्षेप असल्याचा ठपका कर्मचाऱ्यांनी ठेवला आहे.


यामुळे संघातील कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून, त्यांनी अंतिम आदेश तात्काळ देऊन सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या देणग्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा, 1 मे पासून साखळी आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *