बारा इमाम कोठला ट्रस्टच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक व उपाधीक्षकांचा सत्कार
पोलीस दल, महापालिका व विद्युत महावितरण विभागाचे आभार
नगर (प्रतिनिधी)- राज्यात प्रसिध्द असलेले नगर शहरातील मोहरम उत्सव शांतता, सुव्यवस्था आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे पोलीस अधिकाऱ्यांचा बारा इमाम कोठला ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, शहराचे विभागीय पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, तोफखाना येथील पोलीस निरीक्षक आनंद कोकरे व कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा ट्रस्टच्या वतीने चेअरमन सय्यद दस्तगीर बडे साहब यांनी सत्कार केला. यावेळी विश्वस्त शकूर शेख, सय्यद जुबेर हुंडेकरी, नजीर खान, जी.जी. खान, सय्यद निसार जहागीरदार, खालिद सय्यद, साजिद आरिफ उर्फ संजू जहागीरदार, सय्यद निहाल जहागीरदार, जीशान सय्यद, सय्यद रफा वाहिद अली (मुजावर), राहील जहागीरदार आदी उपस्थित होते.
चेअरमन सय्यद दस्तगीर बडे साहब म्हणाले की, एकाच वेळी आलेले मोहरम आणि आषाढी एकादशी हे धार्मिक सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीसांची भूमिका महत्त्वाची राहिली. पोलिसांनी केलेले शिस्तबद्ध नियोजनामुळे मोहरमच्या शेवटचे 5 दिवसाचे विविध धार्मिक कार्यक्रम, भंडारा आणि सवाऱ्यांची मिरवणुक शांततेत पार पडली. या उत्सवाला कोठेही गालबोट लागू न देता, पोलीसांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच बारा इमाम कोठला ट्रस्टच्या वतीने सर्व पोलीस दल, महापालिका आयुक्त, महापालिका अधिकारी-कर्मचारी, विद्युत महावितरणचे अधिकारी-कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले.