शिरपूर येथील सबज्युनिअर स्पर्धेत उपांत्य फेरी पर्यंत गेलेल्या नगरच्या खेळाडूंचा सत्कार
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा जिंकणे, हे जिल्ह्याचे प्रथम ध्येय -नरेंद्र फिरोदिया
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन खेळासाठी व खेळाडू घडविण्यासाठी दिशादर्शकाची भूमिका पार पाडत आहे. खेळाडूंसाठी सोयी-सुविधा निर्माण करून देण्याचे काम केले जात आहे. राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा जिंकणे, हे जिल्ह्याचे प्रथम ध्येय असून, त्यापुढे अजून मोठी वाटचाल सुरु राहणार आहे. मुलींमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु असून, महिला खेळाडू पुढे येत आहे. खेळाडूंनी मान्यता नसलेल्या फुटबॉल स्पर्धेत सहभागी होऊ नये, असे आवाहन असोसिएशन अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी केले.
अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या पदाधिकारी व कार्यकारी सदस्यांची बैठक हॉटेल आयरीश प्रिमीयर येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षीय भाषणात फिरोदिया बोलत होते. यावेळी शिरपूर (जि. धुळे) येथे 12 वर्षाखालील आंतर जिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप सबज्युनिअर स्पर्धेत उपांत्य फेरी पर्यंत गेलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील मुलांच्या संघातील खेळाडूंचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, मानद सचिव रौनप फर्नांडीस, सहसचिव प्रदीपकुमार जाधव, सहसचिव व्हिक्टर जोसेफ, सहखजिनदार रणबीरसिंग परमार, कार्यकारी सदस्य पल्लवी सैंदाणे, राजेंद्र पाटोळे, सादिक सय्यद, सॅवियो वेगास, जेव्हिअर स्वामी आदींसह खेळाडू व पालक उपस्थित होते.
पुढे फिरोदिया म्हणाले की, अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनची स्थापना होऊन 52 वर्षे झाली. सर्वात जुनी संघटना असलेल्या या असोसिएशनने जिल्ह्यात फुटबॉल जिवंत ठेवण्याचे काम केले. जगातील एक नंबरचा खेळ म्हणून फुटबॉलकडे पाहिले जाते. या खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी असोसिएशन कार्य करत आहे. शहरातील दोन मुली मुख्य पंच म्हणून पुढे आल्या, हे मोठे यश आहे. फुटबॉलला नवीन उंचीवर घेऊन जाण्याचे कार्य सुरू असून, खेळाडूंना घडविण्यासाठी संघटना सक्षमपणे उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व विविध स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचा आढावा घेण्यात आला. तर भविष्यात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद पटकाविण्याचा संकल्प करण्यात आला. जिल्हा फुटबॉल असोसिएशनने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. प्रशिक्षण व सरावामुळे खेळाडू पुढे जात आहे. प्रशिक्षकांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केल्याने खेळाडूंमध्ये खेळाचे कौशल्य निर्माण होत आहे. जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडूंचे भविष्य उज्वल असून, चांगले खेळाडू घडणार असल्याच्या भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केल्या.
मुख्य प्रशिक्षक विक्टर जोसेफ व राजू पाटोळे यांनी खेळाडूंसाठी असोसिएशनच्या वतीने स्पर्धेला जाणे-येण्याची मोफत सोय करून, स्पर्धेच्या ठिकाणी चांगली व्यवस्था करुन देण्यात आल्याची माहिती दिली. शिरपूर (जि. धुळे) येथे झालेल्या अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघातील खेळाडू भार्गव पिंपळे (कर्णधार), माहिर गुंदेचा (उपकर्णधार), यदुवर कोकरे, इंद्रजित गायकवाड, स्तवन ठोंबे, विराज दिघे, नमण दिवाणी, जोएल साठे, विरेंद्र वीर, सोहेल खान, श्रेयश बोठे, राजवर्धन वीर, अनुज दरेकर, अविनाश वल्लाळ, सियॉन बागुल, आयुष गाडळकर, देवांश झरेकर, पियुश म्हैसमाळ यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शेवटी सी लायसेंन्स कोच जॉय जोनाथन व जेव्हिअर स्वामी व महिला पंच सोनिया दोसानी व प्रियांका आवारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पावसाळ्यानंतर अहमदनगर जिल्हा लिग स्पर्धा व त्यानंतर ॲलेक्स फर्नांडीस कप भरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सहसचिव प्रदीपकुमार जाधव यांनी प्रास्ताविक करुन आभार मानले.
अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनची परवानगी नसलेल्या फुटबॉल स्पर्धेत खेळाडूंना सहभागी होता येणार नसल्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. परवानगी नसलेल्या फुटबॉल स्पर्धेत खेळाडूंनी सहभाग घेतल्यास त्यांना असोसिएशनच्या मान्यता प्राप्त स्पर्धेत खेळता येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. तर वर्ष 2024-25 साठी सीआरएस नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
