संत गाडगे महाराज जयंती व मौलाना अबुल कलाम आजाद पुण्यतिथीचा उपक्रम
महापुरुषांचा आदर्श ठेवून सामाजिक प्रश्नावर कार्य करण्याची गरज -जालिंदर बोरुडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने संत गाडगे महाराज जयंती व देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. नागरदेवळे येथे झालेल्या आरोग्य शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विविध प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात आले.
या शिबिराप्रसंगी फिनिक्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ. संजय झिने, डॉ. विशाल भिंगारदिवे, मौलाना रफिक फारुकी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, महापुरुषांनी तत्कालीन सामाजिक प्रश्न व वंचित घटकांसाठी कार्य केले. त्यांचा आदर्श ठेवून आजच्या सामाजिक प्रश्नांवर कार्य करण्याची गरज आहे. सध्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा परवडत नसल्याने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांना आधार दिला जात असल्याचे म्हणाले. तर नेत्रदान व अवयवदान चळवळ ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट करुन या चळवळीत योगदान देण्याचे आवाहन केले.
डॉ. संजय झिने यांनी उपस्थितांना निरोगी आरोग्यासाठी आहार व व्यायामाचे महत्त्व सांगितले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचे मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडांचे आजार, नेत्र तपासणी व कॅल्शियम तपासणी करण्यात आली. या शिबिराचा 218 ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. आरोग्य तपासणी करून गरजूंना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.