अबॅकस मध्ये केले संशोधन
भारतातील पहिल्या पीएचडीने अबॅकसच्या मोजणीमधील हातच्याची सोडवली अडचण
नगर (प्रतिनिधी)- येथील रक्षिता महिला मंचच्या संस्थापिका कल्पना अशोक घडेकर-कारले यांना भारत सरकारच्या नीती आयोग, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय तसेच सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय आणि आयर्लंड ॲक्रेडेशन फोरमच्या वतीने प्रमाणित लिजेंड्री पीस अवॉर्ड कौन्सिल या शैक्षणिक विद्यापीठाची अबॅकस या गणितीय संकल्पनेतील मोजणीमधील हातच्याची अडचण सोडवणाऱ्या क्रांतीकारी संशोधनाबद्दल केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पहिली पीएचडी प्राप्त करण्याचा मान प्राप्त झाला आहे.
येत्या आठवड्यात नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे शानदार समारंभात मान्यवरांच्या शुभहस्ते घडेकर यांना ही पदवी प्रदान केली जाणार असून, अबॅकसमधील विस्तृत नवसंशोधन कार्य हे सुमारे 37 नाविन्यपूर्ण संकल्पनांचे संशोधन त्यांनी विद्यापीठीय समितीला सादर केले होते. गेल्या पंचवीस वर्षांपासून भारतासह सुमारे 45 देशांमध्ये शाखा असणाऱ्या एवरेस्ट अबॅकस अकॅडमीसाठी सौ.घडेकर अबॅकस मार्गदर्शिका म्हणून काम करत आहेत.
विद्यार्थ्यांना आकडेमोड करत असताना होणाऱ्या चुकांची अनेक कारणे शोधून उलटी गुणाकार करण्याची पद्धत, भागाकाराची क्लिष्ट पद्धत, अबॅकस पाटीवर मधल्या रॉडवर बेरीज आणि वजाबाकी करण्याची पद्धत यामध्ये घडेकर यांनी संशोधनातून विविध उपाय करून विविध बदल केल्यानंतर विद्यार्थ्यांचे आकडेमोड करण्याची गती वाढवली. शिवाय संख्या वाचण्यात गफलत होत होती. त्यापासून विद्यार्थ्यांना सुटका मिळाली. या संशोधनामुळे कमीत कमी वेळात विद्यार्थी अचूक उत्तरे देऊ लागली. अबॅकसवर आकडेमोड करताना पूर्वी जो गोंधळ होत होता तो गोंधळ पूर्णपणे थांबला. क्लिष्ट पद्धती नष्ट होऊन विद्यार्थी हसत खेळत अबॅकसचा उपयोग करू लागले. परिणामी पालकांचा व विद्यार्थ्यांचा अबॅकस वरील विश्वास वाढला. अबॅकसवर आकडेमोड करण्याच्या वरील पद्धती सर्वमान्य होऊन राज्य, देश तथा जगभरातील विविध अबॅकस अकॅडमींनी वरील पद्धतीचा स्वीकार केला. या सर्व संशोधनांचा समितीने सखोल अभ्यास केला.
भारतातील अबॅकसमधली पहिली पीएचडी मिळवताना गेल्या दोन ते तीन दशकांच्या मेहनतीला यश आले आहे. भारतीय शिक्षण पद्धतीतील गणितासाठी अबॅकस महत्त्वाची संकल्पना असल्यामुळे त्यातील माझे नवसंशोधन हे निश्चितच शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या संशोधनामध्ये एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या शिक्षिका व विद्यार्थी यांची मोलाची मदत झाली. देशातील 100 टक्के शाळांमध्ये अबॅकस शिकवले जावे. असे प्रतिपादन घडेकर यांनी केले.
घडेकर यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी जि.प. अध्यक्षा शालिनीताई विखे, भाजपाचे नेते प्रेमकुमार शुक्ला, काँग्रेसचे नेते गुर्दिक सिंग सप्पल, मनीष चत्राह, नेते माणिकराव ठाकरे, माजी आमदार बबनराव पाचपुते, आमदार विक्रम पाचपुते, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा खासदार पाशा, खासदार जोगेंद्र कवाडे, संभाजी रोहकले आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.