• Thu. Jan 1st, 2026

उद्यानातील ठेकेदारांचे करार रद्द करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळ आग्रही

ByMirror

Jun 2, 2024

खासगी ठेकेदारांना नोटीसा काढल्याने बागोड्या सत्याग्रह तुर्त स्थगित

बालकांची गैरसोय, तुटलेली खेळणी व आर्थिक लुटीने जनता त्रस्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील महापालिकेच्या उद्यानातील खाजगी ठेकेदारांचे करार रद्द करण्यासंदर्भात लोकभज्ञाक चळवळीने पुढाकार घेतला असून, महापालिकेने खासगी ठेकेदारांना नोटीसा काढून महापालिकेच्या माध्यमातून उद्यानाची देखभाल केली जाणार असल्याचे आश्‍वासन दिल्याने संघटनेने जारी केलेला बागोड्या सत्याग्रह तुर्त स्थगित करण्यात आला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


महापालिका हद्दीतील महालक्ष्मी उद्यान, गंगा उद्यान आणि सिद्धी बागेतील खाजगी ठेकेदारांचे करार रद्द करण्यासंदर्भात कारवाई सुरू करण्यात आली आहे. याबाबत ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीसा काढण्यात आल्या आहेत. तर शहरातील सर्व उद्यानांची देखभाल महापालिकाच करणार असल्याचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन यांनी दिल्यामुळे सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


संयुक्त राष्ट्र संघाच्या नियमाप्रमाणे प्रशासनाने मुलांना बौद्धिक वाढीबरोबर शारीरिक वाढीसाठी खेळाच्या मोफत सोयी-सुविधा, उद्यान, क्रीडांगण उपलब्ध करून देण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे महापालिकेने उद्यानांमध्ये लहान मुलांकडून एक रुपया देखील घेता कामा नये आणि आधुनिक पध्दतीच्या खेळांच्या साहित्याची व्यवस्था करुन शहरातील मुलांना खेळासाठी महापालिकेने प्रोत्साहन देण्याची लोकभज्ञाक चळवळीची मागणी आहे. या मागणीला मनपाचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


या चळवळीत सहभागी होऊन शहरातील सर्व पालकांनी सहकार्य केले पाहिजे. शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक ढब्बू मकात्या म्हणजे मला काय त्याचे? या प्रवृत्तीने वागतात, त्यामुळे महापालिकेमध्ये सत्तापेंढारी यांनी शहरातील रस्ते, उद्याने व इतर कामाच्या टक्केवारीने लूट सुरू ठेवली आहे. निवडणुकीमध्ये कोट्यावधी रुपये मतदारांना वाटून पुढील पाच वर्षे ती अनेकपटीने मिळवण्याच्या मागे सत्तापेंढारी असतात. त्यातून महापालिका सेवा अतिशय निम्नस्तरीय झाली असल्याचा आरोप ॲड. कारभारी गवळी यांनी केला आहे.


येत्या पंधरा दिवसात महापालिका आयुक्त पंकज जावळे यांच्याबरोबर बैठक घेऊन शहराच्या उद्यानातील असलेली गैरसोय, तुटलेली खेळणी व सुरु असलेली आर्थिक लुट थांबविण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. यासाठी ॲड. गवळी, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, अशोक सब्बन, वीर बहादूर प्रजापती, डॉ. रमाकांत मरकड, डॉ. महबूब शेख, अर्शद शेख, सनी थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *