• Thu. Mar 13th, 2025

एकात्मिक ज्ञान सिद्धांतद्वारे मानवतेसाठी क्रांती घडविण्यास पीपल्स हेल्पलाइनचा पुढाकार

ByMirror

Feb 26, 2025

महाशिवरात्री ऊर्जा आणि चेतनेचा समन्वयातून मानवी क्रांतीचा प्रारंभबिंदू ठरेल -ॲड. कारभारी गवळी

नगर (प्रतिनिधी)- महाशिवरात्री हा सण केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नाही, तर तो ऊर्जा आणि चेतनेच्या समन्वयाचे प्रतीक आहे, महाशिवरात्री हा सण केवळ धार्मिक रहाणार नाही, तर तो मानवी क्रांतीचा प्रारंभबिंदू ठरेल. धनराई आणि रेन गेन बॅटरीमधून ऊर्जा चक्र टिकवणे, आणि शिक्षण आणि संस्कारांच्या माध्यमातून चेतना विकसित करणे यामुळे मानवतेसाठी एक नवे युग निर्माण होणार असल्याचे मत पीपल्स हेल्पलाइनचे ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले आहे.


ॲड. गवळी म्हणाले की, भगवान शंकर हे चेतनेचे सर्वोच्च रूप आहेत, आणि त्यांचे तांडव नृत्य हे सृष्टी, स्थिती आणि संहार यांचे प्रतीक आहे. आजच्या काळात, एकात्मिक ज्ञान सिद्धांत द्वारे ऊर्जा आणि चेतनेच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करून मानवतेसाठी नवीन क्रांती घडवता येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


महाशिवरात्रीचे महत्त्व व्यक्त करताना ऊर्जा आणि चेतनेचा समन्वय महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, ऊर्जा चक्राच्या संतुलनाचे साधन म्हणजेच वृक्षारोपण, जलसंधारण आणि जैवविविधतेचे संवर्धन. हे सर्व पर्यावरणाला सशक्त बनवतात आणि निसर्गाशी एकरूप होण्यास मदत करतात. त्यांनी विश्‍लेषण करताना धनराई (ड्राय लँड हॉर्टिकल्चर) आणि रेन गेन बॅटरी यांच्या उपयोगाचा उल्लेख केला. यामुळे ऊर्जा चक्र कायमस्वरूपी चालू ठेवता येते, आणि शाश्‍वत शेती व पर्यावरणपूरक जीवनशैली साधता येत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.


मानवी चेतनेचा विकास: शिक्षण आणि संस्कारांच्या महत्त्व स्पष्ट करताना ॲड. गवळी यांनी ऊर्जा व्यवस्थापनासोबतच मानवी चेतनेचा विकास अत्यंत आवश्‍यक आहे. शिक्षण आणि संस्कार यांचा प्रचार करून समाजात क्रांतिकारी बदल घडवता येऊ शकतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने, शिवतत्त्वाचे आत्मसात करून सुसंस्कृत, विवेकी आणि संवेदनशील समाज निर्माण करण्याची आवश्‍यकता आहे. संस्कार आणि शिक्षण यांचा योग्य प्रचार आणि प्रसार करण्यासह, प्रत्येक व्यक्तीच्या विचारांची शुद्धता आणि कृतीतील नीतिमत्ता वाढवली जाऊ शकणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


एकात्मिक ज्ञान सिद्धांत हे ऊर्जा आणि चेतनेच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. यामध्ये ऊर्जा चक्र टिकवण्यासाठी धनराई आणि रेन गेन बॅटरी यांचा प्रभावी उपयोग केला जातो, तर नॉन-जेनेटिक माहितीचे संवर्धन शिक्षण आणि संस्कारांच्या माध्यमातून होते. याचा परिणाम ज्ञान आणि कर्माच्या उच्चतम क्रांतीमध्ये होतो, असे ते म्हणाले.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि शक्तीचा संगम साधून ऊर्जा आणि चेतनेचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिव हे नियम आणि शिस्तीचे प्रतीक, तर शक्ती हे सृजनशक्तीचे प्रतीक आहे. या दोघांचा संयोग मानवाच्या उन्नतीचा मार्ग आहे. ॲड. गवळी यांनी हेही स्पष्ट केले की, महाशिवरात्री हा सण केवळ उपवास किंवा जागरणाचा सण नाही, तर तो ज्ञान, ऊर्जा आणि चेतनेचा मिलाफ साधून मानवी जीवनाची पुनर्रचना करण्याचा दिवस आहे.


आजच्या विज्ञानयुगात, महाशिवरात्री ही ऊर्जा आणि चेतनेच्या समन्वयाची संकल्पना व्यापक पद्धतीने अमलात आणण्याची संधी देत आहे. धनराई, रेन गेन बॅटरी, शिक्षण आणि संस्कार यांची एकत्रित अंमलबजावणी केल्यास, मानवी जीवन अधिक समृद्ध, संतुलित आणि टिकाऊ होऊ शकते. यामुळे निसर्ग आणि समाज यांच्यातील समतोल प्रस्थापित करता येणार असल्याचा विश्‍वास पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *