दुष्काळी परिस्थिती हटविण्यासाठी रेन गेन बॅटरी तंत्राची गरज असल्याचा दावा
पाणी टंचाईवर मात करण्याचा आधुनिक शास्त्रीय मार्ग -ॲड. कारभारी गवळी
नगर (प्रतिनिधी)- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने दुष्काळ आणि दारिद्य्र कायमचे संपविण्यासाठी शेतकऱ्यांना रेन गेन बॅटरीचा अवलंब करण्याची हाक देण्यात आली आहे. शेताच्या शिवारात रेन गेन बॅटरी बसवून वर्षभर पिकांसाठी जमीनीत ओलावा निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर लवकर संघटनेचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याकडे शासनाच्या माध्यमातून रेन गेन बॅटरीला प्रोत्साहन देण्याचा आग्रह धरणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
जगभर पर्यावरणाचा प्रश्न आणि अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा सातत्याने जाणवत आहे. याला मानवी स्वार्थ आणि निसर्गाची लूट कारणीभूत ठरलेली आहे. निसर्गाच्या नियमांना पायदळी तुडवून केलेल्या लुटीतून ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु निसर्गाशी भागीदारी करून दुष्काळ, पाणीटंचाई आणि दारिद्य्र त्याशिवाय ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक जमिनीच्या मोठ्या तुकड्यात रेन गेन बॅटरी बसवण्याशिवाय पर्याय नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पिकांना आणि झाडांच्या मुळांना सतत ओलावा टिकून ठेवण्यासाठी रेन गेन बॅटरीचा नक्कीच उपयोग होतो. फळबागा किंवा शहरी भागातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांपासून 5 फुट अंतरावर 3 फूट लांब, 3 फुट रुंद आणि 5 फुट खोलीच्या खड्ड्यात दगड गोटे टाकून वरच्या बाजूला जाड मुरूम पसरवून पावसाचे पाणी या खड्ड्यात वळविले तर शेजारच्या सर्व झाडांच्या मुळांना वर्षभर ओल टिकून राहते.
दोन एकर जमिनीच्या उताराला आडवा 20 फूट लांबीचा, 5 फूट रुंदीचा व 8 खोलीचा खड्डा खोदून त्यामध्ये दगड, गोटे भरून वरच्या बाजूला जाड मुरूम पसरविल्यास पावसाचे पाणी अशा खड्ड्यात सोडून दिले तर पावसाचे पाणी वाया जात नाही आणि बाष्पीभवन होत नाही. पडणाऱ्या पावसाच्या 80 टक्के पाण्याचा उपयोग शेतकरी या रेन गेन बॅटरीच्या माध्यमातून जमिनीखालची ओल टिकवून ठेवू शकत असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.
रेन गेन बॅटरीमुळे पाण्याची पातळी वाढते व जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी त्या शेतकऱ्याला उपयोगात आणता येते. जमिनीच्या खालच्या मुरूमामध्ये वर्षभर ओल टिकून राहते. ग्लोबल वॉर्मिंग आणि पाणी टंचाई विरुद्ध रेन गेन बॅटरी आधुनिक शास्त्रीय मार्ग आहे. याला सरकारने देखील अनुदान देण्याची गरज असल्याची भावना ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली आहे.