आष्टी-नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी
रेल्वे प्रशासनातील अनागोंदीचा निषेध
नगर (प्रतिनिधी)- आष्टी-नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि..19 ऑक्टोबर) शहरातील रेल्वे स्टेशन समोर वंदे मराठवाडा डेमु एक्सप्रेसचा पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या वतीने सूर्यनामा करुन सुरु रेल्वे प्रशासनातील अनागोंदीचा निषेध नोंदविण्यात आला.
प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन आंदोलनाला प्रारंभ करण्यात आले. हातात तिरंगा ध्वज घेऊन कार्यकर्त्यांनी आष्टी-नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सत्याग्रही मार्गाने झालेल्या आंदोलनात ॲड. कारभारी गवळी, जाफर भाई (कर्जत), भाऊसाहेब सुद्रिक (कोपर्डी), भारतीय जनसंसदेचे राज्य अध्यक्ष अशोक सब्बन, शहराध्यक्ष रईस शेख, प्रकाश थोरात, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंभे, बाळासाहेब पालवे, शेख अल्ताफ रहीम, संदेश रफारिया, वीर बहादूर प्रजापती, सुधीर भद्रे, बबलू खोसला, नारायण रोडे, सोमनाथ घाडगे, विजय शिरसाठ, राम धोत्रे, सुनिल टाक, अरुण खिची आदी सहभागी झाले होते.
नगर-पुणे अंतर 105 किलोमीटर आहे. आष्टी-नगर अंतर 65 किलोमीटर आहे. या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाची गेली तीस वर्षापासून कार्यान्वीत करण्याचे काम सुरु आहे. परंतु हा रेल्वे मार्ग आज ही पूर्ण झालेला नाही. मागच्या वर्षी नगर-आष्टी रेल्वे मार्ग सुरु करण्यात आला. त्यावर नगर- आष्टी डेमो रेल्वे सुरू झाली, परंतु प्रवाश्यांनी प्रतिसाद दिला नाही. किमान 60 कोटी रुपयांची डेमो गाडी नगरच्या रेल्वे स्टेशनवर गेली अनेक महिने गंजत ठेवण्यात आली आहे. या गाडीवर दररोज अडीच लाखापेक्षा जास्त खर्च होत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणने असून, यावरुन एकंदरीत रेल्वे प्रशासनाची अनागोंदीने समोर येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पुणे-नगर हे अंतर 105 किलोमीटरचे आहे. हजारोंच्या संख्येने नगरकर पुण्याला ये-जा करतात. पुण्याला जाण्यासाठी निर्माण झालेल्या वाहतुक कोंडीमुळे तीन ते चार तासापेक्षा अधिक वेळ लागत आहे. पुण्या जवळील 20 किमीटरच्या रस्त्यावर प्रचंड वाहतुक कोंडी असते. त्यामुळे नगर-पुणे डेमो ट्रेन सुरू व्हावी, अशी नगरकरांची गेली तीस वर्षांची मागणी आहे. परंतु रेल्वे प्रशासन या बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. नगर जिल्ह्याचे आमदार खासदारांना लोकांच्या प्रश्नांमध्ये रस नव्हता, त्यामुळे प्रशासनातील वांझोटेपणा व रेल्वे प्रशासनातील अनागोंदीने नगर-पुणे डेमू ट्रेन आज पर्यंत सुरू झालेली नसल्याचा संघटनेच्या वतीने आरोप करण्यात आला.
लोकांना आष्टी-नगर-पुणे हा प्रवास सुखाचा होईल आणि हजारो लोकांची त्यामुळे सोय होणार आहे. नगर-पुणे महामार्गावरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या डेमो ट्रेनमुळे सर्वच शैक्षणिक, व्यावसायिक, उद्योग आदी कारणांसाठी जोडला जाईल. या गाडीला चार दोन मालगाडीचे डबे लावून शेतकऱ्यांसाठी वंदे किसन मालगाडी सुद्धा यातून उपलब्ध होणार आहे. मागासलेल्या मराठवाड्याला आर्थिक न्याय देण्यासाठी ही गाडी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. पुढे ही गाडी पुणे-नगर-आष्टी-बीड-परली अशी सुरू करता येईल. त्यासाठी नगर-परली रेल्वे मार्ग बांधण्याचा ध्यास रेल्वे खात्याने घेण्याची मागणी करण्यात आली.
शासन प्रशासनातील मंडळी सत्ता, संपत्ती आणि खोट्या प्रतिष्ठेमध्ये अडकून पडली आहे. त्यामुळे आष्टी-नगर-पुणे डेमू रेल्वे चा बट्ट्याबोळ झालेला आहे. सूर्याच्या प्रकाशात रेल्वे प्रशासनाचा जाहीर पंचनामा करण्याचा प्रयोग सूर्यनामातून करण्यात आला. लोकांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या गरजा बाजूला ठेऊन आणि रेल्वे प्रशासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान जनतेच्या मागण्या मान्य न केल्यामुळे होत असल्याची बाब सूर्यनामातून जनतेसमोर दाखवून देण्यात आली.
भारताचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मराठवाड्याला न्याय देण्यासाठी वंदे मराठवाडा आष्टी-नगर-पुणे डेमू ट्रेन युद्ध पातळीवर सुरू करण्याची अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून यासंबंधी कारवाई न झाल्यास रेल्वे मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळा धावत्या रेल्वे समोर टाकून निषेध नोंदविला जाणार असल्याचा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन रेल्वेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
