आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नवजात बालरोग विभाग व प्रसुती आणि स्त्रीरोग विभागाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नवजात बालरोग विभाग व प्रसुती आणि स्त्रीरोग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. संदीप कदम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानास शहरातील बालरोग तज्ञ व स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

डॉ. संदीप कदम यांनी जागतिक पातळीवर सुरु असलेल्या चांगल्या प्रसवकालीन पद्धती व नवजात बालकांचे विविध प्रकरणांची माहिती देऊन, सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तर शहरातील बालरोग तज्ञ व स्त्रीरोग तज्ञ यांच्याशी संवाद साधून वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन बदल व उद्भवणाऱ्या विविध समस्येवर चर्चा केली. नवजात बालके व प्रसुती झालेल्या महिलांना उद्भवणारे नवनवीन आजार व त्यावरील उपचार पध्दतीवर त्यांनी मार्गदर्शन केले.
हॉटेल आयरिश येथे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आनंदऋषीजी हॉस्पिटलचे डॉ. वसंत कटारिया व डॉ. आशिष भंडारी यांनी डॉ. कदम यांचे स्वागत केले. प्रारंभी डॉ. कदम यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाला भेट देवून नवजात बालकांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्या अद्यावत विभागाचे विशेष कौतुक केले. यावेळी शहरातील बालरोग तज्ञ देखील उपस्थित होते. व्याख्यानाच्या प्रारंभी बालरुग्ण विभागाचे डॉ. श्रेयस सुरपुरे व डॉ. रुपेश सिकची यांनी अद्यावत सोयी-सुविधांनी सज्ज करण्यात आलेल्या आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाची माहिती दिली. यावेळी डॉ. सोनाली कणसे, डॉ. वैभवी वंजारे उपस्थित होते.