• Sat. Feb 14th, 2026

महात्मा फुले साहित्यरत्न पुरस्काराने पै. नाना डोंगरे सन्मानित

ByMirror

Nov 29, 2025

सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय महात्मा फुले साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.


खानवडी (ता.पुरंदर जि. पुणे) येथे झालेल्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात पुणे ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधर यांच्या हस्ते डोंगरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नाट्य अभिनेत्री रत्ना पारखी, संयोजक दशरथ यादव, संमेलनाचे अध्यक्ष शिव व्याख्याते प्रशांत देशमुख, कवी संजय बोरुडे, कवयित्री स्वाती ठुबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचे नगर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध क्षेत्रात कार्य सुरु आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य व धार्मिक क्षेत्रात योगदान देत आहेत. ग्रामीण भागात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविण्याचे कार्य सुरु आहे. तसेच युवकांसाठी व्यसनमुक्तीवर विविध उपक्रम घेऊन जनजागृती केली जात आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गावपातळीवर ग्रामस्थांना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, युवा संमेलन घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी त्यांनी आठ राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि तीन ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी आयोजन केले होते. या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय महात्मा फुले साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांनी डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *