पारंपारिक लेझिम पथकाने वेधले लक्ष
जीवनातील ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रमांना पर्याय नाही -अशोक कडूस
नगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला येथील जिल्ह्यातील एकमेव हिंदी माध्यमच्या पंडित नेहरू हिंदी विद्यालयातील कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण, संस्थेचे सचिव किशोर मुनोत, मुख्याध्यापक सुहास धिवर, शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे आदींसह सर्व शालेय शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

प्रारंभी ढोलच्या गजराने व महाराष्ट्रातील पारंपारिक लेझिम पथकाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थिनींनी लेझिमचे बहारदार सादरीकरण केले. यामध्ये भारत मातेच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनीने सर्वांचे लक्ष वेधले.
अशोक कडूस यांनी जीवनातील ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रमांना पर्याय नाही. परिश्रम जिद्द चिकाटीने यश मिळते. विजयाने हुरळून जाऊ नका व पराभवाने खचू नका. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण दडलेले असतात ते ओळखून त्या गुणांना विकसीत करण्याचे सांगितले. तर विविध क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
जुबेर पठाण म्हणाले की, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्ता महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय जीवनातील विविध उपक्रम आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी फक्त बौद्धिक क्षमता नव्हे, तर इतर कलागुण देखील विकसीत झाले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये संस्कारासह सामाजिक एकतेची भावना निर्माण करणे काळाची गरज बनले असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब बुगे म्हणाले की, हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्र भाषा आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकमेव हिंदी स्कूलमध्ये शिक्षण घेत असल्याचा प्रत्येक विद्यार्थ्याला अभिमान असावा. जीवनात स्पर्धा महत्त्वाची असून, प्रत्येक स्पर्धेत उतरा. तुम्ही किती आनंदी? यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी हे महत्त्वाचे आहे. भाषेमुळे ज्ञान व विचारांची देवाणघेवाण होते. बौद्धिक विकास साधण्याचे काम भाषा करत असते. विविध ज्ञान आत्मसात करण्यासाठी इतर भाषा देखील अवगत करण्याचे आवाहन केले. तर जिथे मैदान जास्त, तेथे दवाखाने कमी. मात्र आपल्या समाजात दवाखान्यांची वाढती संख्या चिंताजनक बाब असल्याचे स्पष्ट करुन, विविध मैदानी खेळ खेळण्याचा त्यांनी संदेश दिला.
किशोर मुनोत म्हणाले की, जीवनात यश प्राप्तीसाठी संस्कार व शिस्त महत्त्वाची आहे. मोबाईलमुळे जीवनाचा महत्त्वाचा वेळ वाया जात आहे. शरीराच्या विकासासाठी खेळ व बुध्दीच्या विकासासाठी वाचन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांच्या सदृढ आरोग्यासाठी व्यायाम, आहार यावर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक कमल भोसले यांनी केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक सुहास धिवर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय बाबासाहेब बोडखे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता शर्मा-जोशी यांनी करुन आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
