शिक्षणाची वारी-वृक्षदिंडी सोहळा उत्साहात;
महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे -मुख्याध्यापक संदिप भोर
नगर (प्रतिनिधी)- केडगावमध्ये आषाढी वारीचा मंगल गजर आणि वृक्ष दिंडीचा जागर यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरच्या बालवाडी ते दहावी पर्यतच्या सुमारे 700 चिमुकल्या वारकऱ्यांचा हा दिंडी सोहळा रंगला होता.
विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताबाई, नामदेव प्रभू, श्रीराम, लक्ष्मण, सिता, संतांची वेशभूषा करून, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात विणा घेत, विठ्ठल रखुमाईच्या नामस्मरणात रमले होते. या दिंडीतून झाडे लावा झाडे जगवा, एक बाळ एक झाड हा संदेश देण्यात आला. यावेळी पंढरीची वारी, वृक्ष दिंड, शिक्षणाची वारीचा संदेश देण्यात आला. दिंडीचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.
दिंडी सरस्वती विद्यालय, मोहिनीनगर मार्गे, केडगाव देवी प्रांगणात आली. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. केडगाव देवी प्रांगणात विद्यार्थ्यांनी सुंदर रिंगण करून पर्यावरण संवर्धनाची गीते गायली. यावेळी मुख्याध्यापक संदिप भोर म्हणाले की, नव्या पिढीतही महाराष्ट्राच्या पारंपारिक संस्कृतीचे रुजवण होण्यासाठी या दिंडी सोहळ्याचे आयोजन दरवर्षी केले जाते. शाळा इंग्रजी असो किंवा मराठी माध्यम तेथे सांस्कृतिक वारसा जपला जात आहे.
सरस्वती विद्यालयात मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार देखील रुजविण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी, स्मिता खिलारी, शिवाजी मगर, अवि साठे, अनिल झिरपे, श्रीकांत चौधरी, बंटी विरकर, प्रसाद जमदाडे, अक्षय कोतकर, संजय शिंदे, सागर ढगे, अतुल देशपांडे, गाडे, बोरगे आदींसह सर्व शालेय शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.