मनःशांती, एकाग्रता आणि तणावमुक्तीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वाढते ताण-तणाव, सततची धावपळ आणि मानसिक दडपण यांपासून मन प्रसन्न व शांत राहण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थ वकील वर्गासाठी विशेष ध्यानधारणा मेडिटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. मनःशांती, एकाग्रता आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा अत्यंत प्रभावी आहे. इतरांचे तंटे मिटवणाऱ्या मध्यस्थ वकिलांचे मन शांत असणे गरजेचे आहे. वकिलांना मेडिटेशनचे प्रत्यक्ष अनुभव न्यायाधीशांनी तसेच राजेश्वरी दीदी यांनी विशद केले.
महावीरनगर, सावेडी येथील ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या सभागृहात हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी राजयोगिनी बी.के. राजेश्वरी दिदी, ॲड. निर्मलाताई चौधरी, बी.के. सुप्रभा दिदी, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. मिना शुक्रे, ॲड. करुणा शिंदे, जिमिल फादर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना ॲड. निर्मलाताई चौधरी यांनी न्यायव्यवस्थेमध्ये सतत तणावाखाली कार्य करणाऱ्या मध्यस्थ वकिलांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी मेडिटेशन ही अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक साधना असल्याचे सांगितले. सततच्या तणावामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांवर मेडिटेशन हा योग्य उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजयोगिनी बी.के. राजेश्वरी दिदी म्हणाल्या की, आजच्या युगात प्रत्येक व्यक्ती तणावाखाली दबलेली आहे. न्याय व्यवस्थेमध्ये तर जबाबदाऱ्या अधिक असल्याने तणावाचे प्रमाणही वाढते. या सर्वांपासून मुक्त होण्यासाठी राजयोग मेडिटेशन शिकणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मेडिटेशन केल्याने मन शांत, स्थिर आणि सकारात्मक राहते. तणावमुक्त जीवनशैलीसाठी हा नैसर्गिक आणि परिणामकारक मार्ग असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
राजयोग शिक्षिका बी.के. सुप्रभा दिदी यांनी मेडिटेशनचे महत्व सांगितले आणि उपस्थितांना प्रत्यक्ष ध्यानधारणा करून घेतली. मनःशांतीसाठी सकारात्मक विचारांची आवश्यकता असून त्यासाठी स्वतःसाठी वेळ देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
