अहिल्यानगर जिल्ह्यात मदत रवाना
अवघ्या दोन तासांत 600 मदत कीटची उभारणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यभरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर पडले आहेत तर शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भीषण परिस्थितीत पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी नगर एम.आय.डी.सी. येथील आमी संघटनेचे उद्योजक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आमी संघटनेने किराणा किट्सची मदत रवाना केली. अवघ्या दोन तासांत साखर, शेंगदाणे, तांदूळ, चहा पावडर, तेल आदी आवश्यक वस्तूंचे 600 पॅकेट्स तयार करून पूरग्रस्तांना पोहोचविण्यात आले.
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांचे अतोनात नुकसान झाल्याने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील उद्योगांना आपल्या परीने पूरग्रस्तांना मदत करा! असे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आमी संघटनेच्या उद्योजकांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला.
संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ म्हणाले की, पूर्वी कोरोना संकटाच्या काळातही आमी संघटना समाजाच्या मदतीसाठी भक्कमपणे उभी राहिली होती. आजही पूरग्रस्तांच्या पाठीशी उभी आहे आणि यापुढेही अशीच उभी राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. मदत रवाना करण्याच्या कार्यक्रमाला अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांच्यासह संजय बंदिष्टी, सागर निंबाळकर, महेश इंदानी, राजेंद्र कटारिया, सुमित सोनवणे, एम.आय.डी.सी. कार्यालयाचे दिलीप काकडे, महेश शिंदे तसेच आमी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.