जीवन सुसह्य होण्यासाठी मिळालेल्या साधनांमुळे चेहऱ्यावर फुलले समाधान
नगर (प्रतिनिधी)- शहर व नगर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना टिळक रोड येथील जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयात दिव्यांग कृत्रिम हातपाय व कॅलिपर्सचे मोजमाप करुन त्याचे मोफत वितरण करण्यात आले. भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (कानपूर), जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय अहिल्यानगर व जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास दिव्यांगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात शहर व ग्रामीण भागातील 57 अस्थिव्यंग दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम हात, पाय, कॅलिपर्स व अत्यावश्यक साधने मोजमाप घेवून लगेच वितरीत करण्यात आले. दिव्यांगांना आपले जीवन सुसह्य होण्यासाठी मिळालेल्या सहाय्यक साधनांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले होते. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय प्रमुख प्रशांत गायकवाड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रमुख डॉ. अभिजीत दिवटे, प्रकल्प समन्वयक दिपक अनाप, एस.आर. ट्रस्टचे संचालक डॉ. रुपेश जाधव, अलिम्को कंपनीचे अधिकारी एस.एस. चुमले, जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयाच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी, जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय मुख्याध्यापक तथा तालुका समन्वयक विजय आरोटे व अलिम्को, कानपूर यांची तज्ञ कर्मचाऱ्यांचा संघ व विद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
प्रहार दिव्यांग संघटना अहिल्यानगरचे अध्यक्ष ॲॅड. लक्ष्मण पोकळे यांनी शिबीरास भेट देऊन विद्यालयाचे नियोजन बद्दल समाधान व्यक्त केले. या सर्वांच्या नियोजनबध्द कामामुळे सदर शिबीर यशस्वी झाले.
