• Wed. Oct 15th, 2025

अनाथ व निराधार मुलांनी रंगाची उधळण करीत लुटला चित्रकलेचा आनंद; राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचा उपक्रम

ByMirror

Aug 5, 2025

बालघर प्रकल्पात रंगली चित्रकला स्पर्धा

उपेक्षीत घटकातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट कला व कल्पनाशक्ती दडलेली -साहेबान जहागीरदार

नगर (प्रतिनिधी)- तपोवन रोडवरील बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ व निराधार मुलांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने एक वेगळी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विधान परिषदेचे आमदार व राष्ट्रवादीचे नेते इद्रिस नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली.


ही स्पर्धा बालघर प्रकल्पाच्या परिसरात पार पडली. निसर्ग चित्र, माझी शाळा आणि माझा आवडता प्राणी या विषयांवर विद्यार्थ्यांनी जीवनातील रंगमय कल्पनांचे दर्शन घडवत कागदावर रंगांची उधळण केली. विद्यार्थ्यांनी साकारलेली निसर्गचित्रे व शाळेची दृश्‍ये मनाला भारावून टाकणारी होती. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या नांदणी येथील चर्चेत असलेल्या महादेवी हत्तीणीचे चित्र साकारून काही विद्यार्थ्यांनी सृजनशीलतेचा वेगळा ठसा उमटविला.


याप्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, जाकीर तांबोली, शहेबाज शेख, शाहनवाज शेख, अब्दुल खोकर, फिरोज पठाण, मिजान कुरेशी, बालघरचे संस्थापक युवराज गुंड, मुख्याध्यापिका सरला फंड, रुक्मिणी ठोंबरे, आशिष आहिरे आदी उपस्थित होते.


साहेबान जहागीरदार म्हणाले की, उपेक्षीत घटकातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट कला व कल्पनाशक्ती दडलेली आहे. त्यांच्या हृदयातील भावना चित्ररूपाने व्यक्त होताना पाहून मन भरून येते. आमदार इद्रिस नायकवडी यांच्या सामाजिक जाणिवेतून ही स्पर्धा केवळ एक उपक्रम म्हणून नव्हे तर उपेक्षित विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी घेण्यात आली. वंचित बालकांना सृजनशीलतेसाठी व्यासपीठ देणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रकला स्पर्धा तीन गटांमध्ये विभागली गेली होती. पहिली ते चौथी अ गट प्रथम- खुशी शिंदे, द्वितीय- अनिता माळी, तृतीय- अरविंद हारतुरकर.


इयत्ता पाचवी ते सातवी ब गट प्रथम- पूजा चौधरी, द्वितीय- अक्षय जाधव, तृतीय- रोहिणी जाधव.
इयत्ता आठवी ते दहावी क गट प्रथम- दीपक डुकरे, द्वितीय- सागर राजभर, तृतीय- निशा चौधरी.
या विजेत्या स्पर्धकांना उपस्थितांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *