समर्पण सेवा संस्थेचा उपक्रम; मुलांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य
नगर (प्रतिनिधी)- समाजातील उपेक्षित, निराधार व गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी समर्पण सेवा संस्थेच्या महिला सदस्यांनी एक वेगळा आणि आनंदाने भरलेला उपक्रम राबवला. नगर-मनमाड रोड, सावेडी येथे भरलेल्या डिज्नीलँड फनफेअर मध्ये बालघर प्रकल्पातील अनाथ व निराधार मुलांना घेऊन सहल घडविण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्षा रूपा पंजाबी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी हेमा बस्सी, किरण खोसला, अर्चना खंडेलवाल, रोल्ली जोहरी, नीतू सलुजा, बसंत वाधा, मंजू अरोरा, भाग्यरेखा, प्रतिभा सबलोक, तसेच बालघरचे संस्थापक युवराज गुंड, मुख्याध्यापिका सरला फंड, रुक्मिणी ठोंबरे, आशिष आहिरे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वसाधारण कुटुंबातील मुले विविध खेळ, सहली आणि सणांचा आनंद घेत असतात; परंतु अनाथ व निराधार मुलांना हा अनुभव क्वचितच मिळतो. त्यांच्यासाठी हा दिवस विशेष व आनंदी ठरावा, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हा उपक्रम पार पडला. फनफेअरमधील जॅपनीज झोके, टॉवर, सुनामी, आयपीएल टॉवर, ब्रेक डान्स, टायटॅनिक बोट यांसारख्या झोक्यांचा मुलांनी मनसोक्त आनंद घेतला. प्रत्येक झोक्यावर बसताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता, तर काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रूही दाटून आले.
सहल अधिक रंगतदार व्हावी म्हणून समर्पण सेवा संस्थेच्या महिला सदस्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत, खेळ करत आणि त्यांना प्रेमाने खाऊ वाटप केले. मुलांसोबत वेळ घालवताना प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. या सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी अजय पंजाबी यांनी विशेष सहकार्य केले. समर्पण सेवा संस्थेच्या महिलांमुळे या मुलांना एक अविस्मरणीय दिवस अनुभवता आला. बालघर प्रकल्पाचे संस्थापक युवराज गुंड यांनी संस्थेच्या सर्व महिला सदस्यांचे आभार मानले आणि या उपक्रमामुळे मुलांच्या मनात नवीन उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे स्पष्ट केले.