आदिवासी सेवा संघ व आदिवासी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी रॅली काढून रंगणार सांस्कृतिक कार्यक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात शुक्रवारी (दि. 9 आगॅस्ट) विश्व आदिवासी दिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. आदिवासी सेवा संघ व आदिवासी बहुउद्देशीय सेवा भावी संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर शहरातून पारंपारिक आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी रॅली काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आदिवासी समाज बांधव व नागरिकांना मोठ्या सख्यंने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ गोविंदा सावळे यांनी केले आहे.
आदिवासी समाज पारंपारिक ज्ञान, शाश्वतपध्दती आणि अन्यय जीवनपध्दती मानवी इतिहासाच्या आकलनात आणि अनुकूलास हातभार लावतात म्हणूनच 9 ऑगस्ट 1994 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी दिन साजरा करण्याचे घोषित केले. जगभरात हा दिवस विश्व आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आदिवासी समाज निसर्गाचे जतन व संवर्धन करत निसर्गाच्या सानिध्यात कसे जगावे? याचा आदर्श ते आपल्याला घालून देतात.
जैवविविधतेने अत्यंत समृध्द असलेल्या परिसरात राहत असल्याने त्यांच्या पारंपारिक वेशभूषा, लोकनृत्य, लोकगीते, लोककला, जीवनपध्दती यांचे आपल्याला आकर्षण असते, याची नागरी समजाला ओळख व्हावी या उद्देशाने आदिवासी संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे आदिवासी कलाकर पारंपारिक आदिवासी बोहडा कला नृत्य सादर करणार आहेत. ही लोककला सादर करण्याचे काम अकोले तालुक्यातील धामणवन व धाराचीवाडी येथील आदिवासी समाज बांधव करतील. तसेच यानिमित्ताने सकाळी 9:30 वाजता भव्य पारंपारिक आदिवासी वेशभूषेसह लोकगीत गात शहरातून रॅली काढणार आहे. या रॅलीचे प्रारंभ लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयातून होणार असून, वाडियापार्क, माळीवाडा वेस, माळीवाडा बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्वास्तीक चौक मार्गे पुन्हा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रॅलीचा समारोप होणार आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात विविध सांस्कृतिककार्यक्रम होणार असून, यामध्ये आदिवासी समाजात निस्वार्थ सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींना अदिम पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे. सेवानिवृत्त कमर्चाऱ्यांचा सपत्निक सन्मान देखील होणार आहे. यावेळी विशेष व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाज काल, आज आणि उदया या विषयावर योगशे सारोक्ते आपले विचार मांडणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाग्यश्री पाटील, ॲड. विक्रम वाडेकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापुर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. नितीन तळपाडे, प्राचार्या डॉ. माहेश्वरी वीरसिंग गावीत उपस्थित राहणार आहे.