भविष्यातील शुभ, अशुभ घटणांचे सांगण्यात येणार भाकीत
देवाच्या भगताची गावातून वाजतगाजत मिरवणूक
अहमदनगर (प्रतिनिधी)- भविष्यातील शुभ, अशुभ घटनांचे भाकीत सांगणाऱ्या बिरोबा होईकाचे रविवारी (दि.29 ऑक्टोबर) निमगाव वाघा येथील बिरोबाच्या मंदिरात आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह राज्यात निमगाव वाघा येथील होईक प्रसिध्द असून, भविष्यवाणी ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत असतात. तर मागील वर्षी सांगितलेले होईक खरे ठरत असल्याने नागरिकांमध्ये या होईकाची उत्सुकता असते.
बुधवारी (दि.25 ऑक्टोबर) देवाचे भगत नामदेव भुसारे यांची वाजतगाजत गावातून मिरवणुक काढण्यात आली. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी भुसारे यांचे स्वागत केले. मिरवणूकीच्या समारोपानंतर चार दिवसासाठी ते बिरोबा मंदिरात देवा जवळ बसले असून, दररोज देवाची पूजा करीत आहेत. शनिवार (दि.28 ऑक्टोबर) कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी गावात छबीना मिरवणुक निघणार आहे. मिरवणुकीनंतर मंदिरात संध्याकाळी आरेवाडी बिरोबा देवस्थानचे पुजारी जगन्नाथ कोळेकर व त्यांचे सहकारी बिरोबाच्या ओव्या गाणार आहे. तर रविवारी सकाळी 10:30 वा. नामदेव भुसारे यांच्या अंगात वारे संचारल्या नंतर ते पुढील वर्षाचे होईक (भविष्य) सांगणार असल्याची माहिती पै.नाना डोंगरे यांनी दिली.
मागील वर्षी सांगण्यात आलेली त्यांची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली असून, दरवर्षी होईक एकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक गर्दी करतात. होईक नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब जाधव, रामदास वाखारे, अंशाबापू शिंदे, बाबा पुंड, संजय डोंगरे, पांडुरंग गुंजाळ, बबन कापसे, बाळू भुसारे, रोहीदास रोहकले, अशोक भुसारे, परबती कदम, अंबादास निकम, बशीर शेख, नवनाथ जाधव, सुरेश जाधव, ठकाराम शिंदे, रावसाहेब भुसारे, एकनाथ भुसारे, राजू भुसारे, शिवाजी पुंड, अरुण पुंड आदी परिश्रम घेत आहे.
