स्पर्धांमुळे युवकांना स्वत:च्या क्षमता ओळखता येतात -न्यायाधीश भाग्यश्री पाटील
युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- स्पर्धांमुळे युवकांना स्वत:च्या क्षमता ओळखता येतात. तर आकलन शक्तीला चालना मिळते. प्रत्येक तरुणांमध्ये जन्मजात ऊर्जा, सामर्थ्य क्षमता असते. त्याची ओळख युवकांना विविध स्पर्धेतून होत असते. युवकांना प्रोत्साहन दिल्यास भारताला जागतिक महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले.
जय युवा अकॅडमी, जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्राच्या वतीने 9 ते 12 जानेवारी दरम्यान सावेडीतील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत न्यायाधीश पाटील बोलत होत्या. यावेळी जय युवाचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, विशेष जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, नोटरी पब्लिक भारत सरकारचे ॲड. सुमतीलाल बलदोटा, माहेरच्या अध्यक्षा रजनी ताठे, गायत्री गुंड, ॲड. विद्या शिंदे आदी उपस्थित होते.
न्यायाधीश पाटील म्हणाल्या की, युवाशक्ती ही सर्व क्षेत्रांमध्ये निर्णायक घटक आहे. युवकांनी कायद्याची देखील माहिती घेणे आवश्यक आहे. विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याने युवकांमध्ये स्पर्धात्मक गुण विकसित होणार आहेत. स्वामी विवेकानंद यांना प्रेरणास्त्रोत ठेवून युवकांनी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
ॲड. सुरेश लगड यांनी 11 जानेवारी रोजी निबंध वक्तृत्व, हस्ताक्षर, चित्रकला, लोकगीतावर आधारित समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, लोककला, पथनाट्य, मेहंदी, ब्युटी टॅलेंट शो अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार असून, युवकांनी मोठ्या संख्येने राष्ट्रीय युवा सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन केले.
या स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत्र तसेच विजेत्यांना आकर्षक स्मृती चिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेचे परीक्षण नृत्य विशारद अनंत द्रविड, गीतकार सुनील महाजन, ॲड. अनिता दिघे, डॉ. अमोल बागुल, विद्या सोनवणे, अनिल साळवे, कावेरी कैदके, सागर अलचेट्टी, पोपटराव बनकर, दिनेश शिंदे करणार आहेत. या सप्ताहासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, प्रवीण कोंढावळे, भाऊराव वीर, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला प्रयत्नशील असल्याची माहिती स्वागताध्यक्ष किशोर डागवाले व सुहासराव सोनवणे यांनी दिली.