डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी निबंध व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार मतदारांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धेसाठी माझे मत माझे भविष्य, एका मताची शक्ती, मतदान राष्ट्रीय कर्तव्य, मी नव्या युगाचा मतदार, सशक्त लोकशाहीतील निवडणुक व मतदान प्रक्रिया हे विषय देण्यात आले आहेत. निबंध हा पाचशे शब्दा पर्यंत असावा.
मतदार जागृतीवर पोस्टर स्पर्धेसाठी घोषवाक्यांचा वापर करुन आपल्या कल्पनाशक्तीने चित्र काढायचे आहे. या स्पर्धेत आपल्या मनातील मतदार जनजागृतीवर विषय व संकल्पना मांडण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निबंध आणि पोस्टर स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन अशा दोन गटात होणार आहे.
लोकशाही सदृढ होण्यासाठी युवकांसह प्रत्येक नागरिकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग महत्त्वाचा आहे. भारत हा युवकांचा देश असून, युवकांनी जागृकतेने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतल्यास मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याची अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी व्यक्त केली आहे. स्पर्धकांनी निबंध व पोस्टरच्या प्रवेशिका 10 मे पर्यंत संस्थेचे कार्यालय स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, अध्यक्ष पै. नाना डोंगरे, निमगाव वाघा ता. जि. अहमदनगर 414005 या पत्त्यावर पाठवावे व अधिक माहितीसाठी 9226735346, 8605775261 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.