शहरासह तालुका पातळीवरही होणार रक्तदान
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि.24 जानेवारी) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जुना बाजार येथील संजय एजन्सी येथे होणाऱ्या रक्तदान शिबिरात सर्व केमिस्ट बांधव, केमिस्ट कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, दुकानातील कर्मचारी व औषध विक्री प्रतिनिधी सर्व फार्मसी महाविद्यालयांना सहभागी होण्याचे आवाहन केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर व ए.आय.ओ.सी.डी.ए. निमंत्रित सदस्य अजित पारख यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून जगन्नाथ (आप्पासाहेब) शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत संघटनेच्या सर्व झोनमधील सर्व जिल्ह्यांमध्ये शहरासह तालुकास्तरावर देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. एकाच दिवशी 75 हजार पेक्षा जास्त रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
या शिबिराने राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून निघण्यास मदत होणार आहे. केमिस्ट असोसिएशन सेवाभावाने विविध उपक्रम राबवीत आहे. त्याच्याच एक भाग म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिह्यातील सर्व तालुकास्तरावर रक्तदान शिबिर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी आबासाहेब बेद्रे, प्रशांत उबाळे, मनिष सोमानी, भरत सुपेकर, मनोज खेडकर, मनिषा आठरे व सर्व संचालक मंडळ यांनी नियोजन केले आहे.