• Tue. Jul 8th, 2025

वन विभागातील अनियमितता व बदल्याप्रकरणी चौकशीचे आदेश

ByMirror

Jul 3, 2025

प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक यांनी काढले पत्र


जनहितार्थ जन आक्रोश संघटनेच्या आंदोलनाला यश


वन्य प्राण्यांच्या हत्येप्रकरणी देखील होणार चौकशी

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याच्या वन विभागातील अनियमिता, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, वन्य प्राण्यांच्या हत्येच्या चौकशीच्या मागणीसाठी जनहितार्थ जन आक्रोश संघटनेच्या वतीने नाशिक येथील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षण कार्यालया समोर उपोषण करण्यात आले.


संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपोषणाची दखल घेऊन प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक जी.मल्लिकार्जुन यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. या आंदोलनास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण आंधळे पाटील व सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी पाठींबा दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे, बाबासाहेब डोळस, बबनराव झरेकर, विजय सासवडे, हरेश्‍वर साळवे, जेष्ठ महिला शांताबाई आंबेडकर आदी उपस्थित होते.


वनविभागातील 61 बदली प्रक्रियात अनियमिता तसेच वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, वन्य प्राण्यांच्या हत्ये नंतर गुन्हेगारांना अभय देण्याचा करण्यात येणारा प्रयत्न यासंदर्भात चौकशी करण्याची संघटनेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती. या संदर्भात माहिती देण्यासही कार्यालयाकडून टाळाटाळ केली जात होती. कारवाई होत नसल्याने आंबेडकर यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.


प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी उप वनसंरक्षक अहिल्यानगर यांना पत्र देऊन वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील शिकार प्रकरणांमध्ये न्यायालयात तात्काळ चार्जशीट दाखल करावे, वनपरिक्षेत्र अधिकारी टाकळी ढोकेश्‍वर तालुका पारनेर यांच्या कार्यालयात जाणे-येणे करिता शेतकऱ्यांना, जेष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी चांगला रस्ता उपलब्ध करून द्यावा तसेच विभागीय कार्यालयातील वनपरिक्षेत्र अधिकारी अहिल्यानगर, पारनेर, टाकळी ढोकेश्‍वर, तिसगाव व राहुरी यांच्या कार्यालयाबाबत असणाऱ्या तक्रारीची माहिती देण्यात यावी व टाकळी ढोकेश्‍वर वनपरिक्षेत्रातील गारगोटी उत्खनन व झाडे तोडीच्या घटना घडल्याच्या तक्रारीची दखल घेऊन अति तात्काळ चौकशी करण्याचे लेखी आदेश देऊन तात्काळ अहवाल मागविला आहे. हे लेखी पत्र संबंधित विभागाकडून मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले.


योग्य व पारदर्शक चौकशी होऊन अहवाल प्राप्त न झाल्यास संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा मुंबईच्या आझाद मैदानात अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *