अहिल्यानगर मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटनेचा ठिय्या
एकही कॉपी केस नसताना केंद्र संवेदनशील कसे? शिक्षकांचा प्रश्न!
स्टेशनरी वाटपच्या बैठकीवर बहिष्कार टाकून केले निदर्शने
नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या सर्वच केंद्रावर सरमिसळ पध्दतीला विरोध दर्शवून, अहिल्यानगर मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात मंगळवारी (दि.4 फेब्रुवारी) बोर्डाच्या परीक्षेसाठी स्टेशनरी वाटप संदर्भात झालेल्या बैठकीवर बहिष्कार टाकून जिल्ह्यातील केंद्र संचालकांनी संघटनेच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन केले होते.
या आंदोलनात जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, मिथुन डोंगरे, बालाजी गायकवाड, लक्ष्मीकांत नांगरे, विजय नरोटे, अंशुमन वाकचौरे, जयश्री सरवदे, बाळासाहेब खिलारी, कैलास मोकळे, जे.के. नरवडे, एस.ए. शेख, बी.ए. पारखे आदींसह जिल्ह्यातील केंद्र संचालक शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नुकतेच होणाऱ्या दहावी-बारावी बोर्ड परीक्षा संदर्भात शिक्षक आमदार व संघटनेच्या मागणीनंतर जिल्ह्यामध्ये परीक्षेत दरम्यान सरमिसळ करण्यासंदर्भात सर्व संघटनांनी विरोध दर्शविला आहे. हा निर्णय स्थगित करण्याची मागणी सर्व शिक्षक वर्गातून होत आहे. सर्व तालुक्यांमध्ये संवेदनशील सेंटरच्या नावाखाली केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांची हेळसांड सुरू केली आहे. तथापि हा निर्णय रद्द होऊन सुद्धा संवेदनशीलतेचा काय निकष लावला? कोणते धोरण ठरविले? याची माहिती दिलेली नाही. ज्या सेंटरवर अद्यापही कॉपीचे एकही कारवाई झालेली नाही, अशा ठिकाणी सुद्धा सेंटर बदलायचे आदेश आले असून, हा चुकीचा प्रकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हा प्रकार न थांबल्यास सर्व संघटना मिळून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षकांच्या वतीने देण्यात आला आहे. मागील वर्षी परीक्षा कालावधीमध्ये अनेक शिक्षकांवर हल्ले झाले. मात्र त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करण्यात आलेला नाही. सरमिसळ प्रकारामुळे दुसऱ्या सेंटरवर शिक्षक गेल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतरवर हल्ले झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
काही तालुक्यांमध्ये वर्षभर नसलेले विद्यार्थी परीक्षेत कसे येतात?, कला-क्रीडा व इतर प्रस्ताव पुणे बोर्ड मध्ये न स्वीकारता प्रत्येक जिल्ह्याच्या वाटप केंद्रावर स्वीकारण्यात यावेत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रोस्टर नाशिक विभाग मागासवर्गीय पक्षाकडून तपासले जात नाहीत त्यामुळे शालार्थ आयडी साठी रोस्टरची अट शिथिल करावी, केंद्र संचालकांची व स्टेशनरी क्लार्कची संवेदनशील केंद्रामधून बदल करू नये, पेपर तपासणीसाठी शाळेकडून शिक्षकांच्या अद्यावत याद्या घ्याव्या, प्रॅक्टिकलसाठी शिक्षकांची नावे व फोन नंबर जुनेच अपडेट न करता सदरचे नवीन याद्या अद्यावत करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.