शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप
जनकल्याण संस्था, मेरा युवा भारतचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व भारत सरकारचे मेरा युवा भारतच्या वतीने निंबोडी (ता. नगर) येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये निंबोडी जिल्हा परिषद शाळेच्या ग्रंथालयास पुस्तकांचा संच भेट देण्यात आला तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी मंदाताई जगताप, केंद्रप्रमुख अंबादास गारुडकर, बीआरसी समन्वयक सौ. कुलकर्णी, ग्रामसेवक नरसाळे, माजी सरपंच शंकरराव बेरड, माजी उपसरपंच काकाभाऊ बेरड, प्राचार्य साठे, जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद साळवे, सुभाष काकडे, नितीन गोर्डे, मालनताई जाधव आदींसह ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक आदिसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी पुस्तकांची मैत्री करावी. दररोज वाचनाची सवय लावावी. वाचनातून जीवनाला दिशा मिळते. शालेय वयात अभ्यासाकडे लक्ष दिल्यास भविष्यात निश्चित यश मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष विनोद साळवे म्हणाले की, शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी सार्वजनिक स्वच्छता, शिस्तपालन, खेळ तसेच आवडत्या विषयात सातत्य ठेऊन पुढे वाटचाल करावी. शिक्षणातून चांगले नागरिक घडविण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आले. तसेच मेरा युवा भारतच्या वतीने हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली. या उपक्रमासाठी मेरा युवा भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष तसेच जय असोसिएशन ऑफ एनजीओचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
