ताबेमारी, सत्तामारी रोखण्यासाठी लोकशाही मावळ्यांचा रविवारी शपथविधी
विधानसभेच्या निवडणुकीत लोकमकात्या व सत्तापेंढारी विरोधात घेणार भूमिका
नगर (प्रतिनिधी)- साकळाई योजनेवर ज्या नेत्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांचे तीस वर्षे वाया घालवली त्यांच्याविरुद्ध साकळाई योजना सूर्यनाम्यात पाच वर्षांसाठी लोकशाही कोलदांडा जारी करण्यात आला आहे. तर ताबेमारी, सत्तामारी व गुंडांच्या मारामारीच्या विरोधात लोकशाही मावळे म्हणून कार्य करणाऱ्या नागरिकांना शपथ दिली जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
साकळाई योजनेतील आंदोलक शेतकऱ्यांच्या सहकार्याने आणि पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने रविवारी (दि.27 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे साकळाई योजना सूर्यनाम्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होणार आहेत. सक्रिय सहभागाची लोकशाही असे या सूर्यनाम्याचे स्वरूप आहे. सत्तापेंढारी आणि लोकमकात्या नेत्यांविरुद्ध लोकशाही डिच्चूकावा आणि लोकशाही डिच्चू फत्ते धोरणात्मक कृती कार्यक्रम मंजूर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी डिच्चू कावा आणि डिच्चू फत्ते स्वराज्यात कायद्याचे राज्य आणि लोककल्याणासाठी वापरले. परंतु सध्याच्या लोकशाहीमध्ये डिच्चू कावा आणि डिच्चू फत्ते सत्याग्रही आणि अहिंसक मार्गाने फक्त मतपेटीद्वारे राबविला जाणार आहे. स्वातंत्र्योत्तर 21 व्या शतकात सत्तापेंढाऱ्यांनी लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीला तीलांजली देऊन घराणेशाही राबवली आहे. त्यामुळे अशा सत्तापेंढारी आणि लोकमकात्यांना पुढील पाच वर्षांसाठी लोकशाही कोलदांडा म्हणजेच पुढील पाच वर्षासाठी सार्वजनिक जीवनातून बाजूला ठेवण्याचा कार्यक्रम राबविण्याचा निर्धार संघटनेच्या माध्यमातून केला जाणार आहे.
यंदाची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही मतदारांना पूर्णपणे लोकशाही मावळे होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने आग्रही भूमिका घेतली आहे. शिवाजी महाराजांचे मावळे हे मोठ्या प्रमाणात शेतकरी होते. सुगीच्या दिवसात शेती करून इतरवेळी मावळे होऊन ते लढत असत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील नऊ कोटीपेक्षा जास्त मतदारांना लोकशाही मावळे करण्यासाठी या संघटनांचा प्रयत्न आहे. लोकशाही मावळ्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय या देशातील लोकशाही आणि स्वातंत्र्याची फळे सामान्य माणसांना मिळणार नाही. आज दारिद्य्र व झोपडपट्ट्या वाढत आहे. बेकरी टोकाला पोहोचली आहे, परंतु त्याच वेळेला ताबेमारी, सत्तामारी व मारामारीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात हजारो गुंडागर्दी करणाऱ्या टोळ्या तयार झाल्या आहेत. सत्तापेंढारी अशा टोळ्या लोकशाहीतील सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी गेली अनेक वर्षे वापरत आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला यापुढे लोकशाही मावळा म्हणून काम करावे लागणार असल्याची भूमिका संघटनांच्या वतीने मांडण्यात आली आहे.
सार्वजनिक जीवनातील लोकमकात्या व सत्तापेंढारी विरोधात ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, साकळाई जलसिंचन योजना कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, नारायण रोडे, डॉ. योगेंद्र खाकाळ, सोमनाथ धाडगे, ज्ञानदेव भोसले, सुरेश काटे, संतोष लगड, तात्या नलगे, ओम कदम, प्रकाश थोरात, शाहीर कान्सू सुंबे, अशोक भोसले, वीरबहादुर प्रजापती, कैलास पठारे, सुधीर भद्रे, विठ्ठल पुरम, रईस शेख आदींनी बांगडी अटक सत्याग्रहासाठी प्रचार मोहीम जारी केली आहे.
